MPSC पूर्व परिक्षेकरीता केंद्र बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020
  • काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विद्यार्थी संघटनांनी, सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या MPSC परीक्षांकरीता परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी याचिका दाखल केली होती.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतर मोठ्या शहरात येऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात आणि बऱ्याचदा ते शिकत असलेल्या संस्थेच्या जवळचे ठिकाणाचं परीक्षा केंद्र म्हणून निवडतात.

मुंबई :- काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विद्यार्थी संघटनांनी, सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या MPSC परीक्षांकरीता परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी याचिका दाखल केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतर मोठ्या शहरात येऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात आणि बऱ्याचदा ते शिकत असलेल्या संस्थेच्या जवळचे ठिकाणाचं परीक्षा केंद्र म्हणून निवडतात. परंतू कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन पायी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्याकरीता मोठ्या शहरात आलेले विद्यार्थी पुन्हा आपल्या स्वगृही परतले आहेत. परंतु आता ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा आणि २० सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा याकरीता विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या शहरातील परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणं शक्य होणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांकडून जिल्हास्तरीय केंद्र निवडण्याची मागणी होत होती. अखेर राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी केंद्र बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षेकरीता विद्यार्थ्यांना आता जिल्हा अंतर्गत केंद्र निवडण्याची मुभा दिली गेली आहे. परीक्षेसाठी पुणे हे केंद्र निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना २० ऑगस्टपर्यंत केंद्र बदलण्याची मुदतवाढ दिली आहे. 

नव्याने परीक्षा केंद्र बदलण्याकरीता सर्व विद्यार्थ्यांना आयोगाकडे असलेल्या त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावर लघु संदेश दिला जाणार आहे. तसेच यापुढे विद्यार्थ्यांनी आपल्या सोईनुसार निवडलेले जिल्हा केंद्र पुन्हा बदलण्याची मागणी केल्यास ती मागणी मान्य केली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरता केंद्र बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २१ ऑगस्ट दुपारी दोन वाजल्यापासून २६ ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे.

जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये येथील स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार जिल्हा केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायची कमाल क्षमता निश्चित केली जाणार आहे. यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच जे विद्यार्थी काही कारणास्तव जिल्हा केंद्राची निवड करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केलेल्या अर्जातील कायमस्वरूपी रहिवासी पत्ता असलेल्या जिल्हा परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. परंतु त्या जिल्हा परीक्षा केंद्राची क्षमता संपुष्टात आली तर मात्र विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News