काँग्रेसला ‘पायलट’ हवेत : चेतन भगत

धनंजय बिजले
Sunday, 9 June 2019
  • धर्मापेक्षा राष्ट्रवाद प्रिय
  • प्रियांका गांधींना अध्यक्षपद नको!
  • मोदींबद्दल जनतेला विश्‍वास वाटतो.

भारतीय लेखक सहसा राजकीय भूमिका घेत नाहीत, व्यक्त होत नाहीत, असा आरोप सातत्याने होतो. चेतन भगत मात्र याला अपवाद आहे. समाजमाध्यमे, तसेच स्तंभलेखनातून तो स्वतःची राजकीय मते सातत्याने मांडत असतो. ‘सकाळ’च्या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या चेतनने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपली मते दिलखुलासपणे मांडली. 

धर्मापेक्षा राष्ट्रवाद प्रिय
राष्ट्रवाद हा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा वापरला गेला त्यावर बोलताना चेतन म्हणाला, ‘‘भारतीय समाजाला कट्टर हिंदुत्व मनापासून आवडत नाही. भारतीय लोक धर्मापेक्षा राष्ट्रवादाला जास्त महत्त्व देतात. खरे पाहिल्यास काँग्रेसला राष्ट्रवाद नवा नाही. त्यातूनच काँग्रेसचा जन्म झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने तीन युद्धे जिंकली आहेत. पण या वेळी त्यांचे सारेच चुकले. काँग्रेसला आता बिगरधर्मी राष्ट्रवाद अंगिकारण्याची गरज आहे. 

चेतन भगत... नुसतं नाव जरी घेतलं तरी तरुणाईचे कान टवकारतात. तो काय बोलतो, काय लिहितो याकडे अवघ्या तरुणाईचं लक्ष असते. आजची तरुण पिढी पुस्तके वाचत नाही, अशी चर्चा नेहमी झडते. पण कोट्यवधी तरुण-तरुणींनी त्याच्या पुस्तकांची पारायणे केली आहेत. त्याच्या नऊ कादंबऱ्यांचा खप सत्तर लाखांहून अधिक आहे. भारतातील हा विक्रम मानला जातो. ‘काय पो चे’, ‘थ्री इडियटस’, ‘टू स्टेटस’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ हे त्याच्या कादंबऱ्यांवर आधारीत असलेले हिंदी चित्रपटही गाजले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपली राजकीय मते स्पष्ट मांडतो.

प्रियांका गांधींना अध्यक्षपद नको!
लोकशाही देशात विरोधी पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे लेखक म्हणून मला मनापासून वाटते, असे सुरवातीलाच सांगत तो म्हणाला, काँग्रेसची सध्या दारुण अवस्था झाली आहे. मात्र तरीही काँग्रेस हाच मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे तो वाढणे गरजेचे आहे. पण त्यासाठी काँग्रेसनेही तत्काळ पावले टाकली पाहिजेत. सर्वप्रथम राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले पाहिजे. त्यांना आता पुरेशी संधी देऊन झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष दोन निवडणुका लढला. दोन्ही वेळी पक्ष पराभूत झाला. त्यामुळे पक्षाने तत्काळ पक्षाची धुरा अन्य व्यक्तीकडे द्यायला हवी, असे मत चेतन भगत याने मांडले.

ब्रिटिशांच्या काळात काँग्रेसचा जन्मच लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीच झाला होता, असे सांगत तो म्हणाला, ‘‘आता पक्षाने जनभावना ऐकली पाहिजे. अशा वेळी राहुल यांना आणखी संधी देणे योग्य नाही. त्यापेक्षा पक्षाने नवा चेहरा शोधला पाहिजे. राहुल यांना प्रियांका गांधी याही पर्याय होऊ शकत नाहीत. त्या एकाच नाण्याच्या दुसरी बाजू ठरतील. पक्षात अनेक अनुभवी, तरुण चेहरे आहेत. अमरिंदरसिंग यांच्यासारखे अनुभवी, तर सचिन पायलटसारखा कार्यक्षम नेता पक्षाकडे आहे. खरे तर सचिन पायलटसारख्या हुशार, तरुण नेत्याकडे पक्षाने आता सूत्रे सोपवायला हवीत. पायलट यांना देशातील ग्रामीण, तसेच शहरी प्रश्नांची उत्तम जाण आहे. शिवाय त्यांच्याकडे ‘व्हिजन’ही आहे.

मोदींबद्दल जनतेला विश्‍वास वाटतो.
मोदी यांच्या विजयाचे विश्‍लेषण करताना तो म्हणाला, ‘‘काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत. एखाद्या अभिनेत्याला जसे प्रचंड फॅन-फॉलोअर असतात, त्याचप्रमाणे मोदींचा करिष्मा इतका कसा याचे वर्णन करता येत नाही. पूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात लोकांना माहिती होते. आता तसेच मोदींच्या बाबतीत झाले आहे. विरोधकांकडे सांगण्यासारखेच फार काही नव्हते. मोदींच्याही काही बाबी चुकीच्या असू शकतात. पण ते चोवीस तास काम करतात, ते काही तरी बदल घडवून आणतील असा विश्‍वास आजही लोकांना वाटतो. काँग्रेस यात कमी पडली. सत्ता येईल असे त्यांच्या नेत्यांनी गृहीत धरले. त्यामुळे लोकांनी मोदींकडे पाहात भाजपला मते दिली.’’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News