सीईटीच्या पर्सेंटाइल निकालामुळे गोंधळ; विद्यार्थी-पालक न्यायालयात जाणार

अरुण मलाणी
Friday, 7 June 2019
  • संतप्त विद्यार्थी-पालक न्यायालयात जाण्याच्या तयारीत
  • नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाचे स्वप्न भंगण्याची शक्‍यता 
  • 88 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला 95 पर्सेंटाइल
  • 124 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालाही 95 पर्सेंटाइल

नाशिक: राज्यस्तरावर घेतलेल्या एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यंदा प्रथमच पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर केलेल्या या निकालात त्रुटी असून, कमी गुण असूनही विद्यार्थ्यांना 90 हून अधिक पर्सेंटाइल दिसत असल्याचा दावा आहे. गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाचे स्वप्न भंगणार असल्याने विद्यार्थी न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या चर्चेतून पुढे आले. 

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत यंदा प्रथमच ऑनलाइन स्वरूपात एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली होती. निकालही प्रथमच पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर केला; परंतु या निकालात मोठ्या प्रमाणात तांत्रिक गडबड असल्याचा दावा केला जात आहे. पर्सेंटाइल काढण्याच्या पद्धतीत त्रुटी असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. या घोळामुळे चांगले गुण मिळवूनही नामांकित महाविद्यालयात प्रवेशापासून विद्यार्थ्यांना वंचित राहाण्याची वेळ ओढावू शकते. त्यामुळे या संदर्भात दिवसभर राज्यभरात विद्यार्थी व पालकांकडून संतप्त प्रतिक्रियांचे पडसाद उमटताना दिसले. काही विद्यार्थी निकालाला आव्हान देण्यासाठी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून, यामुळे प्रवेशाच्या पुढील प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

काय आहे नेमका घोळ? 
यंदा प्रथमच ऑनलाइन स्वरूपात परीक्षा झाली. यात 2 व 3 मेस पीसीएम ग्रुपची विविध शिफ्टमध्ये परीक्षा झाली. 4, 5 मेस पूर्णवेळ व 6 मेस सकाळ सत्रात सीईटी परीक्षा झाली नाही. पुढे 13 मेपर्यंत सीईटी परीक्षा चालली व दुसऱ्या टप्प्यात पीसीएमबी ग्रुपचे पेपर झाले. कथित आरोपांनुसार शिफ्टनिहाय मिळालेल्या गुणांवरून पर्सेंटाइल काढण्यात आल्याने निकालात घोळ निर्माण झाला आहे. निकालातील त्रुटीमुळे 88 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला 95 पर्सेंटाइल अन्‌ 124 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालाही 95 पर्सेंटाइल गुण दाखविले जात असल्याचा दावा आहे. 

असे काढले जाते पर्सेंटाइल 
"अ" विद्यार्थ्याच्या मागे असलेले एकूण विद्यार्थी, भागिले एकूण विद्यार्थी, गुणिले शंभर या सूत्रानुसार पर्सेंटाइल काढले. उदाहरणार्थ "अ' विद्यार्थ्याचा गुणांनुसार एकूण विद्यार्थ्यांमध्ये त्याचा 20 हजारावा क्रमांक आहे व परीक्षेला एक लाख विद्यार्थी बसले असतील. 80 हजार ("अ" विद्यार्थ्यामागे असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या) भागिले एक लाख, गुणिले शंभर. या सूत्रानुसार "अ' विद्यार्थ्यास 80 पर्सेंटाइल येते. 

"एमएचटी-सीईटीच्या पर्सेंटाइल पद्धतीच्या निकालामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. 95 पर्सेंटाइलपेक्षा खालील विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेल्या नामांकित महाविद्यालयात प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. निकालातील तांत्रिक त्रुटीमुळे हा घोळ झाला आहे". 
- हरीश बुटले, संस्थापक सचिव, डिपर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News