पनवेलमध्ये ‘आयटीत मराठी, ऐटीत मराठी’  या कार्यशाळेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

ही कार्यशाळा महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर सर्वदूर उपलब्ध असलेल्या ५ हजारांहून अधिक एमएस-सीआयटी केंद्रांवर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. त्याचा मराठी राजभाषादिनानिमित्त जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन जयंत भगत यांनी केले आहे

पनवेल : मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून एमकेसीएलतर्फे पत्रकारांसाठी ‘आयटीत मराठी- ऐटीत मराठी’ ही विनामूल्य कार्यशाळा नवीन पनवेल येथील शाहू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे पार पडली. शाहू इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक व एमकेसीएलचे कोकण प्रमुख जयंत भगत यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचा पनवेल व नवी मुंबईतील ३० हून अधिक पत्रकारांनी लाभ घेतला. 
या कार्यशाळेत टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे, मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे, जुन्या मराठी पानांच्या फोटोवरून त्याचे शब्द मिळविणे, मराठीतून टाईप करणे, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मीडियावर मराठी वापरणे अशी उपयुक्त प्रात्यक्षिके तज्ज्ञांमार्फत सादर करण्यात आली.  

डिजिटल उपकरणांवर मराठी भाषा वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना मातृभाषेतून तंत्रज्ञान वापरता आल्यामुळे उच्चशिक्षित टेक्‍नोसॅव्ही आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील डिजिटल दरी कमी होऊन वेळ, पैसे तर वाचत आहेच आणि नवीन संधीही मिळत आहेत. इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीतजास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, याकरीता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) प्रयत्नशील आहे. त्यासाठी मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून एमकेसीएलतर्फे ‘आयटीत मराठी- ऐटीत मराठी’ ही दोन तासांची विनामूल्य कार्यशाळा २४ ते २९ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केली आहे. 

जागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी, अस्मितेसाठी आणि उन्नतीसाठी योजलेला हा उपक्रम सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News