स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, "परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची अटही शिथिल करा"

यिनबझ
Sunday, 11 October 2020

परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकीकडे भविष्यातील संधी कमी होत आहेतच, दुसरीकडे कुटुंबियांकडून अभ्याससोडून काहीतरी कमविण्याच्या दृष्टीने हालचाल करण्याचा दबाव विद्यार्थ्यांवर वाढत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर त्यांच्या मनातील खदखद टीम यिनबझला जाणवली.

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, "परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची अटही शिथिल करा"

पुणेः राजकारण सांभाळताना नियोजित स्पर्धा परीक्षा सरकारने ऐनवेळी पुढे ढकलल्या आहेत. कोव्हिडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वरवर पाहता हा निर्णय योग्य वाटत असला तरी अनेक इच्छूक उमेदवारांचे वय मात्र त्यांच्या करिअरच्या आड येऊ घातले आहे.

परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकीकडे भविष्यातील संधी कमी होत आहेतच, दुसरीकडे कुटुंबियांकडून अभ्याससोडून काहीतरी कमविण्याच्या दृष्टीने हालचाल करण्याचा दबाव विद्यार्थ्यांवर वाढत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर त्यांच्या मनातील खदखद टीम यिनबझला जाणवली.

सोनाली पवार ही विद्यार्थीनी म्हणाली, "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही वेळेवर झाल्या पाहिजे. आधीच कोरोनाने वेळापत्रक बिघडविले आहे. परीक्षा कधी होणार हे कोणालाच माहिती नाही. या अनिश्‍चिततेच्या गर्तेत विद्यार्थी अडकले आहेत. हा पेच लवकर सुटणार आहे की नाही असा प्रश्‍न पडतोय.''

सोमनाथ काळे (नाव बदलले आहे) म्हणाला, "मला माझ्या वयाच्या ३८ वर्षापर्यंत परीक्षा देता येणार आहे. पण २०२० चे वर्ष परीक्षा न देताच वाया जाणार असं वाटतय. भविष्यात परीक्षा देण्यासाठी माझ्या हातात फक्त चार वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा सोडून देऊन इतर काही तरी करावे म्हणून माझ्यावर घरातून दबाव येत आहे. परीक्षा पुढे ढकलण्यामागची कारणं काहीही असली तरी माझ्यासह अनेकांसाठी ही संधी गमविल्यासारखेच आहे. सरकारने यावर त्वरित तोडगा काढला पाहिजे.''

रमेश देशमुख म्हणतो, "जर पुढचे काही महिने परीक्षा होणार नसतील तर त्याबाबत स्पष्टता देऊन परीक्षा देण्यासाठी वय वाढविले पाहिजे. म्हणजे पुढच्या परीक्षेसाठी संधी उपलब्ध होईल. तसेच परीक्षा पुढे गेली तरी अभ्यासही सुरू ठेवावाच लागणार आहे. परीक्षा झाल्याशिवाय अभ्यासातून सुटका होणार नाही.''

  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२० मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, अराजपत्रित गट ब या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करून अर्ज भरून घेतले.
  • राज्यातील सुमारे साडे तीन ते चार लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत
  • एप्रिल व मे महिन्यात या तिन्ही परीक्षा होणार होत्या, पण कोरोनामुळे त्या पुढे ढकलाव्या लागल्या.
  • आता ११ ऑक्‍टोबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार असताना मराठा आरक्षणास स्थगिती आणल्यामुळे मराठा समाजातील तरुणांचे नुकसान होईल त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
  • आता १ नोव्हेंबर रोजी होणारी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व २२ नोव्हेंबरच्या अराजपत्रित गट ब परीक्षेचे काय होणार असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News