स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि कोरोनाचा काळ

अभिषेक गवळी
Tuesday, 30 June 2020

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात स्वतःला ओळखा. आपण काय काय करू शकतो ते पहा. त्यातून प्लॅन 'बी' सुद्धा तुम्ही तयार करू शकता. त्यावर काम करून तुम्ही इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकता. फक्त गरज आहे ती तुमच्या धैर्याची, संयमाची व विचारपूर्वक कृतीची.

आज जागतिक संकट असणाऱ्या कोरोनापासून कोणतेच क्षेत्र वंचित राहिले नाही असे म्हणले तर वावगे वाटू नये. मग त्यात रोडवरील आपले बूट पॉलिश करून देणाऱ्या व्यक्तीपासून ते अगदी मोठमोठ्या उद्योगपतींना सुद्धा त्याचा फटका बसला आहे. प्रत्येक क्षेत्रात सध्या मंदी असल्याने व्यवसाय ठप्प पडत चालले आहेत. त्यातूनच बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने आपसूकच सरकार सुद्धा चिंतेत आहे. हे सगळं चक्र फिरतय ते फक्त अर्थकारणावर. ह्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या बाबी अर्थशास्त्र तज्ज्ञानंतर जर कोणाला माहीत असतील तर त्या फक्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनाच हे नक्की.
 
मंदी येणे, त्यावर उपाययोजना करताना व्याज दर कमी करणे, व नंतर काही कालांतरानं पुन्हा तेजी येणे या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थेत चालू असतात. हे चक्र कायमस्वरूपी फिरते असते हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे आज जरी आपणास वाटत असेल की कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे व जास्तच खोलवर विचार केला तर असे वाटते की; त्यामुळे शासन स्पर्धा परीक्षेच्या जागा कमी करून किंवा शासकीय नोकऱ्या कमी करून महसुली तूट कमी करेल. 

कोरोना वाढला तर हे नक्कीच होईल. परंतु जेव्हा त्यावर लस येईल व कोरोना कमी होईल त्यानंतर मात्र अर्थव्यवस्थेची चक्र अजून एकदा वेगाने फिरतील. भारतासारख्या लोकसंख्या असणाऱ्या देशात शासकीय पदे तर वेळोवेळी भरावीच लागणार आहेत. फक्त एवढंच की यावर्षी परिस्थिती प्रतिकूल असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. अधिकारी होयचंय ना ! मग एखादं वर्ष जास्तीचे लागले तर कुठं बिघडलं ? त्यामुळे मित्रांनो एक लक्षात ठेवा उशिरा का होईना परीक्षा होईलच. फक्त तुम्ही खचून जाऊ नका. नैराश्यात जाऊन चुकीचं पाऊल उचलू नका. ही पण वेळ निघून जाईल हे वाक्य लक्षात ठेवा. सरकार हा सगळा खटाटोप कोणासाठी करतंय ? आपल्यासाठीच ना... तर मग अभ्यास सुरू ठेवा. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात स्वतःला ओळखा. आपण काय काय करू शकतो ते पहा. त्यातून प्लॅन 'बी' सुद्धा तुम्ही तयार करू शकता. त्यावर काम करून तुम्ही इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकता. फक्त गरज आहे ती तुमच्या धैर्याची, संयमाची व विचारपूर्वक कृतीची. पुण्यामध्ये राहिलं तरंच अभ्यास होतो हे जरा डोक्यातून काढून टाका. लहानपणापासून ते बारावी पर्यंत तुम्ही घरी राहूनच अभ्यास केलाय ना ? मग 12 वर्षांनंतर असं काय झालं की घरी अभ्यासच होईना. हा प्रश्न स्वतःला विचारा व उत्तरे शोधा. अभ्यासाला गरज असते ती फक्त तुमच्या सकारात्मक मनाची. मग कोठेही करता येतो अभ्यास. घरी जागा कमी असेल किंवा खूपच गोंधळ असेल तर तुम्ही अभ्यासाची वेळ किंवा जागा बदलू शकता.

स्पर्धा परीक्षेतून मिळणारी कोणतीही पोस्ट आपल्या मौल्यवान आयुष्यापेक्षा तरी नक्कीच मोठी नाही. त्यामुळे पुढील काही महिने घरी सुरक्षित राहूनच अभ्यास करा. असंख्य पुस्तके वाचणाऱ्या तुम्हांला जास्त सांगण्याची गरज अजिबात वाटत नाही. सरतेशेवटी, एवढंच सांगायचं आहे ; स्पर्धा परीक्षेच्या जगात येणाऱ्या विविध संकटांपैकी कोरोना हे सुद्धा एक संकट आहे. त्यावर मात करायची असेल तर घरी रहा आणि अभ्यास करा. पुढील वर्षं आपलंच असेल हे नक्की. Be Positive
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News