अग्नी ही आयुर्वेदातली महत्त्वाची संकल्पना

डॉ. अनुराधा भोसले दिवाण
Saturday, 12 October 2019

आमाची लक्षणे अग्नीच्या बरोबर विरुद्ध आहेत. तो थंड, निस्तेज, जड, तेलकट, स्थूल, साठून राहिलेला, चिकट म्हणून मंदगती आणि दुर्गंधीयुक्त असतो.
आम शरीरात कुठे साठलेला आहे, त्यावरून त्याची पदचिन्हे ठरतात

अग्नी ही आयुर्वेदातली महत्त्वाची संकल्पना आहे. अग्नीच्या ताकदीवर साऱ्या शरीराची सुस्थिती अवलंबून असते. या अग्नीच्या अगदी विरुद्ध गुणांचा पदार्थ म्हणजे ‘आम’; अतिशय दुर्गुणी, विषारी, रोगकारण पदार्थ. तो दुष्ट आणि बिघडलेल्या अग्नीचा परिणाम म्हणून निर्माण होतो आणि अग्नीलाच खाऊन टाकतो. दुष्ट अग्नी आणि आम यांचे दुष्टचक्र निर्माण होते.

संस्कृतमध्ये आम या शब्दाला कच्चा, अपक्व, न पचलेला असे अर्थ आहेत. जो शरीराला वापरता येत नाही, असा न पचलेला टाकाऊ भाग हा नेहमीच्या पचनक्रियेत किरकोळ प्रमाणात तयार होतच असतो. तो बाहेर टाकलाही जातो; पण प्रमाण जास्त झाले आणि उत्सर्जन नीट झाले नाही, तर रोग उद्‌भवतात. रोग आणि व्याधी यांसाठी ‘अमय’ हा जो संस्कृत शब्द आहे त्याचा शब्दशः अर्थ, आमापासून निर्माण झालेला असा आहे. म्हणून ‘निरामय’चा अर्थ होतो उत्कृष्ट आरोग्य.

आमाची लक्षणे अग्नीच्या बरोबर विरुद्ध आहेत. तो थंड, निस्तेज, जड, तेलकट, स्थूल, साठून राहिलेला, चिकट म्हणून मंदगती आणि दुर्गंधीयुक्त असतो.
आम शरीरात कुठे साठलेला आहे, त्यावरून त्याची पदचिन्हे ठरतात. उदा. जिभेवर चिकटा, सर्व प्रकारचे अडथळे, निस्तेज डोळे, त्वचेवरील डाग, जादा वजन, कुंठित रक्तप्रवाह, सूज, ताठरपणा, हालचालीला अटकाव, केसांची मुळे दुबळी होणे, वेदना, शक्तिपात, पचनमार्गात साठलेल्या आमामुळे अन्नाच्या चवीत बदल होतो; भूक नाहीशी होते, अन्नाचा सारभाग शरीरात जिरत नाही; पोटफुगी, मलबद्धता, अजीर्ण, गुद्‌द्वाराला खाज, असे त्रास होतात. शिवाय श्‍वासाला दुर्गंधी, मलमूत्र उत्सर्जनाला त्रास, जास्त श्‍लेष्मा तयार होणे हे त्रासही असतात. उत्साह नसणे, चिंता, गळाठणे हे असते.

दूषित अग्नीमुळे आम होतो की आमामुळे अग्नी दूषित होतो, हे ठरवणे कठीण आहे. आम निर्माण होण्याच्या कारणांचे आहारजन्य, विहारजन्य आणि मानसिक कारणजन्य असे वर्गीकरण होते. थोडक्‍यात, अग्नी बिघडवणाऱ्या सर्व गोष्टी आमाचे कारण असतात. आमामुळे मानसिक स्तरावर उत्साह नसणे, स्वतःबद्दल गौणत्वाची भावना, चिंता, निराशा, अदृष्टाची भीती, गोंधळलेली विचारशक्ती, अशा भावना तयार
होतात.

अग्नी बिघडवणाऱ्या सवयी आमाचे कारण ठरतात. आम तयार होण्यास कारण असणाऱ्या सवयी अग्नीला कुपित करतात.

अ) उदा. आहारजन्य कारणे - आरोग्य-निकस आहार, हावरटपणाने खाणे किंवा खाण्यात समाधान शोधून जास्त खाणे, विरुद्धाहार (चुकीचे संकलन किंवा संयोजन) अति जड, अति तेलकट, अति साखरयुक्त, अति प्रक्रिया केलेले, मीठ-मसाल्याचा प्रमाणाबाहेर वापर, अतिथंड पाणी.

ब ) विहारजन्य -  रात्री जागल्याने वात आणि कफ वाढून अग्नी दुष्ट होतो.
कमी झोप, दिवसाला काहीच वेळापत्रक नसणे, व्यायाम न करणे, अनियमित जेवणखाण, पहिले अन्न पूर्ण पचण्याआधीच परत अन्न घेणे, अवेळी झोप, विशिष्ट प्रकृतीच्या माणसांच्या बाबतीत दिवसा झोप, दाबून टाकलेल्या किंवा असमायोजित भावना (शोक, क्रोध, ईर्षा

इ.) या सगळ्याचा परिणाम म्हणून आम तयार होतो.
आम निरस्त करण्यासाठी  -  लंघन, स्वेदन, प्राणायाम, योग, पंचकर्म उपयुक्त आहेत. मलमूत्र, घाम याद्वारे आम काढून टाकण्यासाठी उपयोगी अशा औषधी वनस्पती आहेत. त्या पचनशक्ती वाढवतात, पेशींची ताकद वाढवतात.स्वेदनामुळे पेशींना चिकटून बसलेला आम सुटून पचनमार्गात जाऊन निरस्त होतो. स्टीमबाथ, सॉना आणि व्यायाम यापैकी कुठल्याही मार्गाने घाम आला तरी तेच साध्य होते. मात्र, पित्तदोष असणाऱ्यांनी अतिरेक होत नाही, याबद्दल सावध असावे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News