दिलासादायक! कोरोना चाचणीचे दर झाले कमी; जाणून घ्या किती असणार दर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 14 June 2020
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई : राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांवर अंकुश आणला आहे. राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 2800 रुपये इतका दर निश्‍चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता. 13) जाहीर केले. यासंदर्भात आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सरकारला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्‍चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी मोफत केली जाते. देशात चाचणी किटची निर्मिती होत असतानाही चाचणीचे दर मात्र जास्त होते. हा खर्च अनेकांना परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे दर निश्‍चित करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने 2 जून रोजी समिती गठीत करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्‍चिती समिती गठीत केली होती. त्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. निर्धारित केलेल्या कालावधीत समितीने आपला अहवाल सादर करून सामान्यांना दिलासा दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्वात कमी दर महाराष्ट्रात

राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारत होते. घरी जाऊन स्वॅब घेणे व त्यासाठी पीपीई कीटचा वापर यासाठी खासगी प्रयोगशाळा 5200 रुपये आकारत होत्या. राज्य सरकारच्या निर्णयामुळे हे दर आता अनुक्रमे 2200 आणि 2800 रुपये, असे झाले आहेत. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नाही. यामुळे नफेखोरीला आळा बसेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या

देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या केल्या जातात, असे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत 6 लाख 24 हजार 977 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 1 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह (16.18 टक्के ) आले आहेत. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News