अंतिम वर्षांच्या परीक्षासाठी महाविद्यालयांची तयारी सुरू...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020
  • अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्याच लागतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षांचे नियोजन करण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे.
  • जिल्ह्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेता निमशहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयांना मात्र विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

वाशिम :- अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्याच लागतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षांचे नियोजन करण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेता निमशहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयांना मात्र विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापकांची डोकेदुखी वाढविण्याचा प्रकार असल्याचा सूर शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेताच निकाल जाहीर करणे आणि पदवी प्रमाणपत्र देणे याला मात्र अनेकजणांचा आक्षेप देखील होता. कोरोना काळात परीक्षा कशा घ्याव्या आणि त्यासाठी यंत्रणा कशी उभारावी याबाबत विविध मते मतांतरे होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा करीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असून, याची पूर्वतयारी करताना विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांची दमछाक होणार आहे. कोरोनामुळे बाहेर ठिकाणचे विद्यार्थी आपापल्या गावी परतले आहेत. परीक्षेसाठी शहरात भाड्याने घर देताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोरोना काळात शक्यतोवर भाड्याने घर ही मिळणार नाही. त्यामुळे राहावे कसे? या प्रश्नाने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार असल्याने एका वर्गात किमान १५ ते २० विद्यार्थीच बसू शकणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची एकाच वेळी सोय करताना दमछाक होईल, यात शंका नाही.

 

बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी आपले महाविद्यालय सज्ज आहे. कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर आवश्यक उपाययोजना परीक्षा केंद्रावर करण्यात येतील. विद्यार्थ्यांना बसण्याची आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी हॉल तसेच खोल्या अशी पुरेशी जागा महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे. शासनाच्या आदेशानुसार चोख व्यवस्था ठेवू.

- डॉ.मिलनकुमार संचेती,प्राचार्य राजस्थान आर्य कॉलेज वाशिम

कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून बसण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. शासनाच्या आदेशानुसार मिळालेल्या नियमांचे महाविद्यालयाकडून पालन करण्यात येतील. त्यादृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू करणार आहोत.

-एस.एन.शिंदे, प्रभारी प्राचार्यसरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम.

विद्यापीठ आणि शासनाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास आपल्या महाविद्यालयाची तयारी आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आवश्यक खबरदारी घेवूनच विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

-किशोर वाहाणे, उपप्राचार्यरामराव सरनाईक समाजकार्य कॉलेज वाशिम

कोरोना परिस्थितीत परीक्षा मुळीच घ्यायला नकोत. एक तर अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन वर्ग झाले. परंतु ऑनलाईन वर्गात नेटवर्कचा खोळंबा, संवादातील विसंगती आदी कारणामुळे परीक्षेची पूर्ण तयारी झाली नाही. शहरात राहावे कुठे हाही महत्वाचा प्रश्न आहे.

- सचिन सुनिल ईवरकरबी.बी.ए. तृतीय वर्ष, रिसोड

उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी अखेर करावीच लागणार आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात येईल. फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार असल्याने काटेकोरपणे नियम पाळण्यात फारशी अडचण जाणार नाही.

- जी.एस.कुबडे, प्राचार्यमातोश्री शांताबाई गोटे कॉलेज वाशिम

कोरोनाच्या पृष्ठभूमिवर परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होता कामा नये. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या निर्देशानुसार आणि शासनाने कोरोनासंदर्भात आखुन दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन महाविद्यालयाने करुन परीक्षा केंद्रावर सर्व व्यवस्था चाख ठेवावी. बाहेरगावचे विद्यार्थी शहरात कुठे राहतील, हाही महत्वाचा प्रश्न आहे.

- पुजा दिलीप हलगेबी. कॉम. तृतीय वर्ष, रिसोड

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News