महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऊर्जेचे स्रोत प्रत्यक्ष हाताळता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 28 June 2020

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत याचे मत

मुंबई : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम, वाहनविरहित बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनविण्याचा मानस असल्याचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. महावितरणच्या ऊर्जा अतिथीगृह नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी कोराडी येथे "ऊर्जा पार्क' प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार जमीन, पाणी आणि मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध असल्याने नागपूर जवळच्या कोराडी येथे ऊर्जेचे विविध स्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात घेऊन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना ऊर्जेचे स्रोत प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी हाताळता यावेत, सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने हा ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. 

ऊर्जा पार्कद्वारे, हरित ऊर्जा, ऊर्जेच्या विविध स्रोतांना आधुनिकतेची जोड देण्यात येणार आहे. ऊर्जा वनस्पतींचे उद्यान, सौर विद्युत व्यवस्था, ऊर्जेच्या विविध स्रोतांचे जसे औष्णिक, जल, वायू, पवन, सौर, बायोमास लाइव्ह मॉडेल्स, सौर चार्जिंग स्टेशन्स, परिसर सौंदर्यीकरण करून हा अभिनव प्रकल्प प्रस्तावित आहे. एकूणच, पर्यटकांच्या दृष्टीने भव्य हनुमान मूर्ती उभारून या माध्यमातून पर्यटनाचे हब बनविण्याचे प्रस्तावित आहे. फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क आणि यशवंत स्टेडियम येथे नवीन स्टेडियम आणि बिझनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News