पोटातून काढले चक्क सव्वादोन कोटींचे कोकेन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

लुईज फर्नांडो डिसोझा (२३) असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो अदिस अबाबा विमानतळावरून मुंबईत आला होता.

मुंबई : अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या २३ वर्षीय परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ८० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या कोकेनची किंमत दोन कोटी ३८ लाख रुपये असून महिनाभरातील अशा प्रकारची ही तिसरी घटना असल्याची माहिती हवाली गुप्तचर विभागाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी दिली.

लुईज फर्नांडो डिसोझा (२३) असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो अदिस अबाबा विमानतळावरून मुंबईत आला होता. एआययूला मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या आठवड्यात त्याला ताब्यात घेण्यात आले. इथोपियन एअरलाईन्सने तो मुंबईत आला होता. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे. जे. रुग्णालयात त्याचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयित कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्‍टरांनी त्याच्या पोटातून ८० कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ७९० ग्रॅम असून त्याची किंमत दोन कोटी ३८ लाख रुपये आहे. चौकशीत त्याने ब्राझीलमधील साओ पावलो येथील एका व्यक्तीने हे कोकेन दिले असल्याचे समोर आले. ते मुंबईत वाहून आणण्यासाठी त्याला एक हजार अमेरिकन डॉलरची (सुमारे ७० हजार रुपये) बक्षिसी देण्यात आली होती. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला. त्यानंतर तो
प्रवासी व्हिसावर भारतात आला. त्याच्या तिकिटाचा खर्चही आरोपीने केला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News