ढग ओथंबूनी आले...

नलेश पाटील
Wednesday, 26 June 2019

तुझ्या चोचीच्या सुईत, ओव पावसाचा धागा 
माझ्या चातक मैतरा, शीव फाटलेल्या जागा

तुझ्या चोचीच्या सुईत, ओव पावसाचा धागा 
माझ्या चातक मैतरा, शीव फाटलेल्या जागा

किती दिवसाने आज, ढग ओथंबूनी आले 
चिंब थेंबांच्या नक्षीने, पक्षी भांबावुनी गेले 
लखलखीत लडीत, गुंफियले साऱ्या नभा...

काठोकाठ भरलेले, घन घंगाळुनी आले 
थेंब थेंब रांगोळीने, रान अंघोळूनी गेले 
पानापानांचे तळवे, थेंब पारखती बघा...

रिमझिम झंकारत, येता पावसाच्या सरी 
लवलवुनी सलाम, पातं गवताचं करी 
ऋतुभर आळविती मेघ, मल्हाराच्या रागा...

शुभ्र सरीची सुतळ, हाती घेउनी कातळ 
किती नितळ पाण्याचे, विणे तलम पातळ 
नभ अलगद सोडी, सैल एक एक मेघा...

सारे क्षितिज धुक्याने, पार आहे पूसलेले 
पाण्यालाही तरंगाचे, गोड हसू फुटलेले 
तुझ्या निळ्या अंगणात, इंद्रधनुष्याच्या बागा...

शेतमळ्याच्या गोधड्या, जागोजागी अंथरल्या 
खोल तळ्याच्या घागरी, आभाळाने तुडुंबल्या 
आली घागरीच्या काठी, चिव चिव लगबगा...

तुझे माहेर डोंगर, अन सागर सासर 
हिरवळीच्या खणाने, ये ग नदी ओटी भर 
दादल्याला भेटण्याला किती मुरडते उगा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News