रोजगाराची नवीन साखळी तयार करणारे क्लाउड काॅम्प्युटिंग

सागर नांगरे
Monday, 16 November 2020

आज आपण मोबाईलवर जे अॅप्लिकेशन्स वापरतो किंवा सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म आले आहेत ते क्लाउडवरच बनविले जात आहेत आणि कन्झ्युमर्सपर्यंत पोचविले जात आहेत.

ढगावर वाढणारे व्यवसाय - २ 

क्लाउड काॅम्प्युटिंग म्हणजे काय आणि त्याची सुरवात कशी झाली याची माहिती आपण यापूर्वीच्या लेखात घेतली. आता आपण या सेवेबद्दल, त्याचे प्रकार आणि कोणत्या क्षेत्रात त्याचा फायदा होतो आहे याची माहिती घेऊया. ही माहिती तुम्हाला तुमच्या छोट्या-मोठ्या व्यवसायाला सुरवात करण्यासाठी म्हणा किंवा आधीपासून असलेल्या व्यवसायाला वाढविण्यासाठी म्हणा खूप उपयोगी पडू शकते. या व्यतिरिक्त या माहितीच्या आधारे तुम्हाला एवढे नक्कीच उमजेल की उद्योग-व्यवसायाच्या गरजा कशा बदलल्या आहेत आणि त्यादृष्टीने आपण आपले स्किलसेट कसे वृद्धिंगत केले पाहिजे.

क्लाउड काॅम्प्युटिंगमध्ये प्राथमिक पातळीवर तीन प्रकारचे माॅडेल असतात. एक म्हणजे साॅफ्टवेअर बनविण्याचे टूल्स किंवा वापरता येण्यासारखे साॅफ्टवेअर. याला साॅफ्टवेअर अॅज ए सर्व्हिस (SaaS) असं म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे साॅफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी लागणारे प्लॅटफाॅर्म (PaaS). याची उदाहरणे म्हणजे मायक्रोसाॅफ्ट सर्व्हर, टाॅमकॅट, अपाची आदी. आणि तिसरा प्रकार म्हणजे साॅफ्टवेअर रन होण्यासाठी लागणारे फिजिकल सर्व्हर म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर अॅज ए सर्व्हिस (IaaS).

क्लाउड काॅम्प्युटिंगची दोन वैशिष्ट्य आहेत. या वैशिष्ट्यांचा कोणत्याही डिजिटल बिझनेससाठी खूप उपयोग होतो. क्लाउड सर्व्हिसचे ग्राहक हे त्यांच्या गरजेनुसार आवश्यक तेवढेच साॅफ्टवेअर, प्लॅटफाॅर्म आणि हार्डवेअरचे रिसोर्सेस वापरू शकतात. ते जेवढे आणि ज्या प्रमाणात रिसोर्सेस सिलेक्ट करतीत तेवढेच पैसे आकारले जातात. त्यामुळे उद्योजक - व्यावसायिकांचा फायदा असा होतो की त्यांना डिजिटल आॅपरेशन्सकरिता खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज राहत नाही. दुसरा फायदा म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, जिथे इंटरनेट वापरता येते तिथून तुम्हाला तुमच्या क्लाउड सर्व्हिसेस वापरता येऊ शकतात. म्हणजेच, तुमचा बिझनेस डिजिटल स्वरुपात येतो, वाढतो आणि त्याची व्याप्ती जगभर पसरते.

क्लाउड काॅम्प्युटिंगच्या या अमर्यादित फायद्यांमुळे उद्योग व्यवसायांमध्ये खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीला सुरवात झाली. अॅमेझाॅनच्या मागोमाग गुगल आणि मायक्रोसाॅफ्ट यांनी स्वतःच्या क्लाउड सर्व्हिसेस बाजारात आणल्या. आज आपण गुगल ड्राईव्ह किंवा मायक्रोसाॅफ्टचे अझुरे वापरतो, ती सगळी क्लाउड काॅम्प्युटिंगचीच उदाहरणे आहेत. क्लाउडमुळे उद्योग क्षेत्रात डिजिटल ट्रान्सफाॅर्मेशन होण्यासाठी खूप मदत झाली. प्राथमिक पातळीवर लागणारे वर्ड, एक्सेलशीटसोबतच नावीन्यपूर्ण साॅफ्टवेअर (SaaS) माॅडेलमुळे उपलब्ध झाले. आज आपण मोबाईलवर जे अॅप्लिकेशन्स वापरतो किंवा सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म आले आहेत ते क्लाउडवरच बनविले जात आहेत आणि कन्झ्युमर्सपर्यंत पोचविले जात आहेत.

क्लाउडमुळे फक्त माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रालाच चालना मिळाली असं नाही. आयटी बरोबरच, फायनान्स, हेल्थ, रिटेल, बिझनेस, इंडस्ट्रियल आणि गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये क्लाउडचा वापर वाढला. आज आपण मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करतो, ऑनलाईन खरेदी करतो, बिल भरतो, काॅलेजच्या अॅडमीशनची सगळी प्रोसेस किंवा सरकारी कागदपत्रेसुद्धा डाउनलोड करतो. यामागचे यशस्वी रसायन म्हणजे क्लाउड काॅम्प्युटिंग आहे. या नव्या प्रकारच्या सेवेमुळे साहजिकच सर्वच क्षेत्रांमधील नोकऱ्यांमध्ये नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक वेगळ्या क्षेत्रामध्ये क्लाऊड वरच्या सिस्टिम्स बनविणे, त्यांचा वापर करणे, त्याबद्दलची ट्रेनिंग देणे आणि त्याची देखभाल दुरुस्ती ठेवणे याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.

क्लाउडमुळे प्रामुख्याने माहितीची निर्मिती आणि देवाण घेवाण खूप प्रमाणात झाली आहे. त्यामुळे जो डेटा साठविला गेला आहे त्याभोवती देखील नवीन रोजगार निर्मिती होत आहे. मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स तंत्राचा वापर करून ट्रान्सफर होणाऱ्या किंवा साठविलेल्या माहितीचे विश्लेषण करून इंटेलिजन्ट इन्साईट्स काढता येतात. या इन्साईट्सचा वापर करून ग्राहकांसाठी नवीन सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट्स बाजारात आणले जात आहेत. यामुळे रोजगाराची नवीन साखळी तयार झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News