तुंग किल्ल्याला गिर्यारोहकांची पसंती

हर्षदा कोतवाल
Wednesday, 15 January 2020

हा ट्रेक अत्यंत सोपा असल्याने पावसाळ्यात नक्की करावा. पावसाळ्यात या किल्ल्यावरून उत्तम नजारा पाहायला मिळतो. शेवाळावरून घसरू नये म्हणून चांगल्या ग्रिपचे बूट आणि रेनकोट असावा. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळातही हा ट्रेक करू शकता

पुण्याच्या आसपास, एका दिवसात होईल, जिथे फार वर्दळही नसेल असे आता कितीसे स्पॉट राहिले आहेत? फारच कमी ना? माझ्याही नकळत मी अशा एक ट्रेक केला होता. निघाले होते कलावंतीणला जायला, पण अचानक ट्रेक रद्द झाला. अन्‌ मग वाट धरली तुंगची. भल्या पहाटे सहा वाजता मी, अभिराज आणि आसावरी ट्रेकला निघण्याची वाट बघत होतो. अपेक्षित बस आलीच नाही आणि आमचा ट्रेक रद्द झाला. मग काय? रविवार तर वाया घालवायचा नाही, पुन्हा घरी गेलो, गाडी काढली आणि तुंग आणि तिकोनाची वाट धरली. 

पुण्यातला सिंहगड, तसा लोणावळ्यातला तिकोना. प्युअर कमर्शियलाझेशन! ऑगस्ट महिन्यातला रविवार असल्याने तुफान गर्दी होती. ती पाहून आम्ही दहा मिनिटांवर गडमाथ्यावर थांबलोच नाही. तिकोनावरून आम्ही तुंगच्या दिशेने निघालो. गडाच्या पायथ्याशी गेलो, तर एक माणूसही नव्हता. कोपऱ्यात एक टपरी होती फक्त. गडाच्या सुरुवातीलाच त्याच्या नावाची पाटी आहे, त्यावर ‘कठीणगड’ असं त्याचं नाव लिहिलं आहे. गड चढायला सोपा आहे. पूर्वी बोरघाटामार्गे होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. 

गड चढायला सुरुवात केली अन्‌ पायऱ्या लागल्या. कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत असताना दोन मुलं उतरत होती. त्यांना विचारल्यावर कळालं, की आता गडावर कोणीच नाहीये. गड चढत असताना उंचीवरून खालच्या तुंगवाडी या गावावरची नजर हटत नव्हती. आता मला गडाचा बालेकिल्ला दिसू लागला होता. गडावर खरंच एकही माणूस नव्हता. हे समजल्यावर माझी पावलं आपोआप हळूहळू चालू लागली. अख्खा गड आपलाच, ही फिलिंग मनात घर करायला लागली. 

तुंग किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना, मोरागड, कोरीगड, पवना धरण, ॲम्बी व्हॅली यांचा भन्नाट नजारा दिसतो. धुकं नसल्यास सिंहगड, राजगड, तोरणा हे किल्लेसुद्धा दिसतात. तासाभरात गड पाहून, निरखून, गडावर अक्षरशः पडी घेऊन आम्ही परत निघालो. रस्त्याला लागल्यावर तिकोना आणि तुंग दिसू लागले. दोन सख्खे भाऊ, पण एक लाडका अन्‌ एक दोडका एवढी एकचं उपमा मला त्या वेळी सुचली. आता भेटूयात पुढच्या ट्रेकवर. बोटींगही करूयात, कॅम्पिंगही करूयात आणि जगंलातून सफरही. बघा ओळखता येतंय का? या ट्रेकचे फाटो आणि व्हिडिओ माझ्या इन्स्टाग्रामवर पाहा इन्स्टाग्राम: harshadakotwal5 

ट्रेक डिटेल्स 
उंची : ३००० फूट 
लागणारा वेळ (पुण्याहून) : २ तास 
पाण्याची सोय : गडावर तीन टाकं असल्यानं पावसाळ्यात भरपूर पाणी उपलब्ध असते. इतरवेळी सोबत दोन लिटर पाणी ठेवावं. 
जेवणाची सोय : गडाच्या पायथ्याशी पावसाळ्यात एक दोन टपऱ्या लागतात. तिथे भजी, वडापाव, मिसळ असे पदार्थ मिळतात. बाकी जेवणाची सोय स्वत: करावी लागते. 

कधी जाल? 
हा ट्रेक अत्यंत सोपा असल्याने पावसाळ्यात नक्की करावा. पावसाळ्यात या किल्ल्यावरून उत्तम नजारा पाहायला मिळतो. शेवाळावरून घसरू नये म्हणून चांगल्या ग्रिपचे बूट आणि रेनकोट असावा. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळातही हा ट्रेक करू शकता. या वेळी जाताना उन्हापासून वाचण्यासाठी पूर्ण कपडे, टोपी आणि सोबत जास्त पाणी असावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News