अड्डा 247'च्या सर्वेक्षणातुन सरकारी नोकरीबाबत 'ही' बाब स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 July 2020

कोरोनाच्या फटक्‍यामुळे खासगी नोकरदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आता नोकरीतील सुरक्षितता हा मुद्दा विचारात घेऊन पुन्हा तरुणांमध्ये सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ झाली आहे.

मुंबई : कोरोनाच्या फटक्‍यामुळे खासगी नोकरदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आता नोकरीतील सुरक्षितता हा मुद्दा विचारात घेऊन पुन्हा तरुणांमध्ये सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ झाली आहे.

गेली काही वर्षे खासगी नोकऱ्यांच्या मोठ्या संधी व चांगले वेतन यामुळे या क्षेत्राला चांगले दिवस होते. इतके दिवस लहान शहरांमधील तरुण चांगल्या खासगी नोकऱ्यांसाठी महानगरांमध्ये जात होते; मात्र आता हा प्रवाह उलटा झाल्याने महानगरांपेक्षा लहान शहरांमध्येच सरकारी नोकरीचे आकर्षण तरुणांमध्ये वाढत आहे. "अड्डा 247' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामधून ही बाब समोर आली आहे. कोरोनाच्या फैलावात सरकारी नोकऱ्यांची स्थिती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

कोरोनाच्या व टाळेबंदीच्या तडाख्यामुळे खासगी नोकरदारांना सर्वात जास्त फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या; तर जवळपास सर्वांचेच पगार घटले आहेत. परिस्थिती न सुधारल्याने बेकारीची टांगती तलवारही आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांच्या मनात नोकरीच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या साडेसहा हजार उमेदवारांपैकी 82.33 टक्के उमेदवारांनी खासगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.

महानगरांमध्ये खासगी नोकरीकडेच ओढा
छोट्या शहरांमधील 66 टक्के तरुणांनी सरकारी नोकऱ्यांना प्राधान्य दिले; तर महानगरांमधील 34 टक्के उमेदवार सरकारी नोकरी करू, असे म्हणत आहेत. महानगरांमध्ये अजूनही सरकारी नोकऱ्यांपेक्षा खासगी नोकऱ्यांमध्ये आकर्षक संधी असल्याने तेथे तरुणांचा ओढा आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये हे प्रमाण कमी-जास्त आहे.

82.33 तरुणांचे सुरक्षिततेला प्राधान्य
सर्वेक्षणानुसार दिल्ली व पाटण्यामध्ये सरकारी नोकरीची मागणी 11 टक्के; तर सर्वात कमी चेन्नईत 3 टक्के होती. पुण्यात हे प्रमाण 4.80 टक्के होते. 82.33 टक्के लोकांनी सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सरकारी नोकरीला प्राधान्य दिले; तर पाच टक्के तरुणांनी सरकारी नोकरीत मिळणारा पगार व 2.77 टक्के लोकांनी सरकारी नोकरीतील इतर लाभ या कारणांमुळे सरकारी नोकरीला पसंती दिली.

खासगी क्षेत्रात कधीही नोकरी जाण्याची भीती व सरकारी नोकरीतील सुरक्षितता यामुळे तरुण पुन्हा सरकारी नोकरीकडे वळू लागले.
- अनिल नागर, सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, अड्डा 247

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News