किल्ले वैराटगडावर स्वच्छता मोहीम होतेय, आपण कधी येताय?

विशालराज पाटील
Thursday, 9 May 2019

शिवक्रांती हिंदवी सेनेने उभारले वैराटगड दुर्गसंवर्धन, किल्ले माहिती फलक 

 

मेढा ; जावळी तालुक्‍याच्या उत्तरेला असलेल्या किल्ले वैराटगडावर शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र संस्थेने स्वच्छता मोहीम राबवून वैराटगड दुर्गसंवर्धन व किल्ले माहिती फलक लावण्यात आले. वैराटगड हा 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला व तेव्हापासून तो स्वराज्याचे शस्त्रागार म्हणून नावारूपास आला. या गडावरून वाईसह जावळी प्रांत, चंदनवंदन गड नजरेस पडतात. 

शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र ही संस्था गेली चार वर्षे महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याची शक्तिपीठे, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गडकोटांचे संवर्धन, स्वच्छता, दुर्गभ्रमंती आदी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याअंतर्गत शिवक्रांती हिंदवी सेनेने वैराटगडावर स्वच्छता केली. त्यानंतर मावळ्यांनी लोखंडी पाइप व रेडियम प्रिंटेड माहिती फलक अक्षरशः डोक्‍यावर घेऊन गडावर नेले. रखरखत्या उन्हात खड्डे खोदून तब्बल नऊ तास मेहनतीने ते गडावर लावले. गडावरील पाण्याची तळी, वैराटेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर, महाद्वार, पहारेकरी देवड्या, शस्त्रागार, सरदाराचे वाडे, चोरवाट अशा कितीतरी गोष्टी या माहिती फलकामुळे गडप्रेमींसाठी सहज दिसू लागल्या आहेत. 

वैराटगडावर शिवप्रेमी व गडप्रेमींची पाण्यासाठी वणवण व्हायची. परंतु, या फलकामुळे त्यांना पाणी कुठे आहे हे सहज उमगत आहे. मोहिमेदरम्यान वन्यजीव पाणवठे बनवून निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश तसेच हुतात्मा जवान शौर्यपदक प्राप्त सूरज मोहिते यांच्या स्मारकाकडे जाणारे फलकदेखील लावले गेले. सरताळे गावाच्या वेशीवर गडावर जाणारी वाट आणि वैराटगड नकाशादेखील लावण्यात आला आहे. राष्ट्रगीताने मोहिमेची सांगता झाली. 

शिवक्रांती हिंदवी सेनेच्या या मोहिमेत स्वप्नील धनावडे, प्रवीण कदम, सुधीर कांबळे, मुकुंद गायकवाड, सुमित, अनिकेत धनावडे, अक्षय धनावडे, प्रताप जगताप, जगदंब फॅब्रिकेशन व डी. पी. इंटरप्रिन्सेसचे रमेश पाटील यांचे योगदान लाभले. त्याबद्दल या तरुणांसह सर्वांचे कौतुक होत आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News