सित्कारी प्राणायाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

या  आधीच्या भागात आपण सोप्या भाषेत दीर्घश्‍वसनाविषयी जाणून घेतले. त्याचा दररोज सराव करणे आवश्‍यक आहे

या  आधीच्या भागात आपण सोप्या भाषेत दीर्घश्‍वसनाविषयी जाणून घेतले. त्याचा दररोज सराव करणे आवश्‍यक आहे. आज आपण प्राणायामाचा आणखी एक प्रकार पाहूया. सध्या उन्हाळा शेवटच्या टप्प्यात आहे. प्रचंड उकाडा जाणवत आहे. शरीरातील उष्णता कमी करून, शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण सित्कारी प्राणायामाबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रथम कुठल्याही सुखकारक आसनस्थितीमध्ये बसावे. म्हणजेच सुखासन, स्वस्तिकासन, वज्रासन किंवा पद्मासन. यापैकी कोणत्याही आसनामध्ये बसणे शक्‍य नसणाऱ्यांनी खुर्चीवर बसावे. महत्त्वाचे म्हणजे पाठ ताठ असावी. जागा स्वच्छ असावी. धूळ, प्रदूषण व इतर कुठलेही उग्र वास नसतील अशाच ठिकाणी नेहमी प्राणायाम करावेत. सित्कारी प्राणायाम करताना सुरवातीला दात एकमेकांवर ठेवून ओठ पूर्णपणे ताणावेत. जिभेचे टोक आतमध्ये दुमडून टाळूला चिकटवण्याचा प्रयत्न करावा. ते शक्‍य नसल्यास जीभ आहे, त्याच स्थितीमध्ये राहू द्यावी. तोंडाने सीत्‌ असा आवाज करत श्‍वास घ्यावा.

श्‍वास पूर्ण घेतल्यावर ओठ बंद करून नाकाने श्‍वास सोडावा. हे एक आवर्तन झाले. अशी १०-१५ आवर्तने करावीत. यामध्ये आता आपण श्‍वास घेणे व सोडणे एवढ्याच क्रियेचा अभ्यास पाहणार आहोत. या प्राणायामाचा व्यवस्थित सराव झाल्यावर यात बंध पण बांधता येतील. सित्कारी प्राणायामाच्या अभ्यासाने शरीराला थंडावा मिळतो. शरीरातील अतिरिक्त उष्णता व उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होते. भूक व तहान नियंत्रित होते. गाल व गळ्याच्या स्नायू तसेच शिरांना ताण बसतो.

त्यामुळे, तेथील रक्ताभिसरण सुधारते. त्यांची कार्यक्षमता वाढते. परंतु सुरवातीला हा अभ्यास करताना घशाला कोरड पडते. दम्याचे रुग्ण, सायनस, सर्दीचे रुग्ण, कफ प्रवृत्ती असणाऱ्यांनी योग्य मार्गदर्शनानंतर हा प्राणायाम करावा. अन्यथा, त्रास वाढू शकतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News