नवी मुंबईत सेकंड हॅंड फर्निचरला तरुणाईची पसंती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • ऑनलाईन खरेदीचा सोपा पर्याय; सतत बदलणाऱ्या भाड्याच्या घरामुळे अल्प गुंतवणुकीसह सोयीचा मार्ग

नवी मुंबई - भाड्याने घर घेताना सामानाच्या शिफ्टिंगसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात व प्रत्येक घरात आधीचे फर्निचर सूट होईल की नाही याची खात्री नसते. त्यामुळे नको ती अडगळ वाढते व पैसे फुकट जातात ते वेगळेच. यावर उपाय म्हणून सध्याची लो मेंटेनन्सला प्राधान्य देणारी तरुणाई सेकंड हॅंड सामान घेणे पसंत करतेय. यात ऑनलाईन ॲपच्या वापराचे प्रमाण जास्त आहे.

आधीच्या पिढीला अशी दुसऱ्याची वस्तू वापरणे, त्यात ती ऑनर्लाइन घेणे म्हणजे तिच्या दर्जाविषयी खात्री वाटत नसल्याने हा पर्याय पटत नव्हता; मात्र नोकरी, शिक्षण व इतर कारणांमुळे भाड्याने राहत असलेल्या तरुणाईला असा पर्याय म्हणजे सोपी गुंतवणूक वाटत आहे. २०-३० हजार व त्यापेक्षा जास्त किमतीचे फर्निचर घ्यायचे; मग त्याच्या देखभालीमध्ये जाणारा वेळ, घराचा रंग बदलला किंवा अजून काही कारणाने ते घरात सोयीस्कर वाटले नाही तर त्याचे काय करायचे, नवीन जागी जाताना त्याच्या शिफ्टिंगचा खर्च, तिथे सूट होईल की नाही याची खात्री नसणे आदी विविध कारणांमुळे तरुणाई या सेकंड हॅंड फर्निचरच्या पर्यायाकडे आकर्षित होत आहे.

सेकंड हॅंड फर्निचरची किंमत अगदी ५०० रुपयांपासून सुरू होते. घेण्याआधी ती वस्तू बघायला मिळणे, किंमत निगोशिएबल असणे, घराच्या जवळ ऑनलाईन शोधण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने शिफ्टिंगचा कमी खर्च, अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असणे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कमी किमतीमधली वस्तू असल्याने कमी वेळेतल्या वापरात पैसे वसूल होतात व पुढील शिफ्टिंगच्या वेळी नवीन वस्तू घेता येते. यामुळे या पर्यायाला प्राधान्य दिले जात आहे.

सविता या नव्याने सीवूडसला शिफ्ट झालेल्या गृहिणीने सांगितले, की आम्ही नुकताच अडीच हजारामध्ये एक दिवाण खरेदी केला ज्याची बाजारात किंमत सात हजारापेक्षा जास्त आहे. हा ऑनलाईन पर्याय आमच्या बजेटमधला तर आहेच; पण पुढच्या वर्षी नवीन घरात हे फर्निचर सूट नाही झाले, तर ते टाकून देताना वाईट नाही वाटणार. अशा प्रकारे खरेदी-विक्रीमुळे फर्निचर अडगळीत पडून राहत नाही व पैसेही मिळतात.

उलवे येथील अभिनित याने सांगितले, की हा खूप स्वस्तातील मस्त पर्याय आहे. मी दुसरीकडे शिफ्ट होत आहे. तेथे माझ्या जुन्या फर्निचरसाठी जागा नाहीय. त्यामुळे मी ऑनलाईन जाहिरात दिली. आतापर्यंत मी दोन सेकंड हॅंड सायकल दोन हजारला  घेतली तसेच एक डायनिंग टेबल ५०० रुपयांना व एक वर्ष जुना सोफा दोन हजार रुपयाला विकला. मला त्या वस्तूंच्या वापरानुसार योग्य किंमत मिळाली. आता मीदेखील माझ्या घराच्या साईजनुसार नवीन फर्निचर ऑनलाईन घेईन.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News