'संतुर्की'ला रसिकांची पसंती

यशवंतदत्त बेंद्रे
Saturday, 8 June 2019

वेबसिरिजनंतर आता वेब सिनेमातही आम्ही पाऊल टाकले आहे. वेबसिनेमाद्वारे वेगळी वाट निवडली आहे, यातही आम्ही नक्की यशस्वी होऊ. 
नितीन पवार, दिग्दर्शक "संतुर्की'.

तारळे : महाराष्ट्रासह जगभरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी वेबसीरिज "गावाकडच्या गोष्टी' ने एक नवा प्रवास सुरू केला आहे. वेबसीरिजच्या यशस्वी दोन पर्वा नंतर पूर्णविराम न घेता "कोरी पाटी प्रोडक्‍शन'च्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी "संत्या-सुरकी' यांची प्रेमकथा आपल्याला नितीन पवार दिग्दर्शित 'संतुर्की' या वेब सिनेमाद्वारे पाहता येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, रसिकांच्या पसंतीला उतरला आहे. त्यामुळे गावाकडच्या गोष्टीची जादू कायम असल्याचे दिसून येत आहे. 

"व्हॅलेंटाईन डे'चं औचित्य साधून दर्शकांसाठी "संतुर्की'चा पहिला टीजर प्रदर्शित केला होता. टीजरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर नेटिझन्समध्ये "संतुर्की'ची चर्चा रंगली होती. संतुर्की या वेब सिनेमाचा ट्रेलर कोरी पाटी प्रोडक्‍शन्स या यूट्युब चॅनेलवर नुकताच प्रदर्शित केला आहे. संत्या सुरकी यांच्या प्रेमकथा समजून घेण्याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली आहे. 

साधी आणि सर्वांना आपलीशी वाटावी अशी कहाणी असलेली "गावाकडच्या गोष्टी' या वेबसीरिजचे दोन यशस्वी पर्व झाले. गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेबसिरीजची हवा झाली. सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेब सीरिजला जगभरातून प्रेम मिळालं. यामधील "संत्या आणि सुरकी' हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय झालं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्तव त्याचं लग्न होऊ शकल नाही. 

लग्न झालेली सुरकी पुन्हा संतोष समोर येतो, तेव्हा त्याची होणारी तगमग किंवा तिच्या मुलाने मामा म्हटल्यावर होणारी गंमत सगळ्यांना भावली. पण, यासोबत सगळ्यांना वेध लागले की इतकं जीवापाड प्रेम करणारी ही दोघं एकमेकांपासून वेगळे का झाले? याचं उत्तर या कोरी पाटी प्रोडक्‍शनच्या "संतुर्की' सिनेमात आहे. 

गावाकडच्या गोष्टी लोकांना इतक्‍या भावल्या की त्यांना खुद्द राज ठाकरे यांनी भेटायला बोलावून यंत्र सामुग्रीची मदत केली. शिवाय, कलर्स मराठी या वाहिनीवर त्यांना बोलावण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांनीही त्यांना निमंत्रण दिले होते. तारळे विभागातील खेडोपाडीच्या व्यक्तींनी आपल्या सुंदर अभिनयाने सर्वांचीच मने जिंकुन सर्वात जास्त सबस्क्राइबर असलेली वेबसिरीज ठरली होती. "संतुर्की' या वेब सिनेमामध्ये संतोष राजेमहाडिक, रश्‍मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर के. टी. पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलीकर, समाधान पिंपळे हे कलाकार सिनेमात असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News