ग्रामीण भागातील मुलांनी यूपीएससी परीक्षेत मिळवले मोठे यश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020
  • प्रबळ इच्छा शक्ती असेल तर असाध्य गोष्ट देखील साध्य होते ह्याचाच प्रत्यय काल लागलेल्या यूपीएससीच्या निकालावरून आला आहे.
  • दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्रातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यापरीक्षेत यश मिळाले असून यावर्षी ग्रामीण भागातील मुलांनी देखील यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

पंढरपूर :- प्रबळ इच्छा शक्ती असेल तर असाध्य गोष्ट देखील साध्य होते ह्याचाच प्रत्यय काल लागलेल्या यूपीएससीच्या निकालावरून आला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्रातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यापरीक्षेत यश मिळाले असून यावर्षी ग्रामीण भागातील मुलांनी देखील यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी या छोट्याशा गावात राहणार राहुल चव्हाण या तरुणाने  संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १०९वा रँक मिळवला आहे. आई आणि वडील दोघेही पालक अशिक्षिक आहेत परंतु त्यांच्यामुलाने मात्र शिक्षणाची कास सोडली नाही. राहुलने आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील यूपीएससी परीक्षेची  तयारी करण्यासाठी विद्येचं माहेरघर असणार पुणे शहर गाठलं. प्रचंड इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर राहुलने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. राहुल याला त्याच्या १०९व्या रँकिंग नुसार आयएएस किंवा आयपीएस ची पोस्ट मिळू शकते, परंतु राहुलचे आयएएस व्ह्याचे स्वप्न असल्याने त्याने यासाठी पुन्हा तयारी करण्याचे ठरवले आहे. 

माढा तालुक्यातील निवृत्त पोलीस हवालदार तानाजी वाकडे यांची कन्या डॉ अश्विनी वाकडे हिने देखील यूपीएससीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. अश्विनीने बी जे मेडिकल कॉलेज मधून MBBS ची पदवी प्राप्त करून यूपीएससीसाठी प्रयत्न सुरु केले. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी मधून यूपीएससी परीक्षेसाठी  मार्गदर्शन घेऊन तिला यश मिळाल्याचे अश्विनीने सांगितले. 

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाने तर सलग तीनदा ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामुलाचे नाव अभयसिंग देशमुख असून हा कासेगाव येथे राहणार आहे. अभयला यूपीएससी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळाल्यांनतर त्याने आपली ट्रैनिंग पूर्ण करून मिळालेले पद स्वीकारले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याला रेल्वे विभागात नोकरी मिळाली. आणि आता सलग तिसऱ्या प्रयत्नात अभय नोकरी करत असताना सुद्धा त्याने परीक्षेत १५१वा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. "जे कराल ते अचूक करा आणि कधीही अपयशाने निराश न होता अभ्यास केल्यास हमखास यश मिळते असे अभय सांगतो". ग्रामीण भागातून असून सुद्धा या मुलांनी देशातील सर्वात आव्हानात्मक समजली जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश खरंच कौतुक करण्यासारखे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News