मुख्यमंत्री भाजपचाच : शिवसेनेत अस्वस्थता

मृणालिनी नानिवडेकर 
Tuesday, 11 June 2019
  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा असतील, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर केल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी जागावाटपाची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधीच झाली आहे. त्यामुळे दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

फडणवीस यांचे ‘मातोश्री’सह शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध आहेत. ते जनतेतही लोकप्रिय आहेत. त्यांचा चेहराच निवडणुकीत यश मिळवून देईल, असा विश्‍वास भाजप नेतृत्वाला असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा अर्ध्या मतदारसंघात भाजपला लढण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. शिवसेना ते जाणून असल्याने चर्चेत कोणताही घोळ होणार नाही, असा विश्‍वास भाजपच्या एका नेत्याने व्यक्‍त केला. 

फडणवीस सरकारने राबवलेल्या योजना, सरकारने विविध समाजगटांना सोबत ठेवण्यासाठी घेतलेले निर्णय याच आधारावर मतदारांना सामोरे जाण्याची भाजपची रणनीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, फडणवीस सरकारचे काम आणि हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आल्याने तयार होणारे बेरजेचे राजकारण यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला नक्कीच यश मिळेल, असा पक्षनेतृत्वाला विश्‍वास आहे. 

दरम्यान,  मित्रपक्षांना १८ जागा देण्याचे ठरले असले, तरी फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आमच्या पक्षाच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊ शकतात. भाजप मित्रपक्षांची केवळ दोन-दोन जागांवर बोळवण करू शकेल, अशी भीती या पक्षांच्या काही नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवली आहे.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप नेत्यांशी बोलून जागावाटपाचे सूत्र निश्‍चित करतील. सध्या तरी मुख्यमंत्री कोण असेल, हा मुद्दा नाही.
- प्रा. मनीषा कायंदे, प्रवक्‍त्या, शिवसेना

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News