छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असूनही केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) परीक्षा घेण्याची परवानगी दिली.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असूनही केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) परीक्षा घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार युजीसीने सर्व विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थी संघटनांनी याला विरोध केला असून याविरोधात रान उठविण्यास सुरुवात केली आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेने परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे; तर विद्यार्थी भारती संघटनेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने युजीसीने एप्रिल महिन्यात परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. ज्या विद्यार्थांना परीक्षा द्यायची असेल त्यांना परीक्षा देण्याचा पर्यायही सरकारने दिला. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युजीसीकडून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाचा धोका असतानाही केंद्र सरकारने परीक्षा घेण्यासाठी युजीसीला निर्देश दिल्याने याविरोधात आंदोलन छेडल्याचे विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे.

युजीसीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत. युजीसीच्या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे युजीसीने जारी केलेले परिपत्रक उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर फाडून या निर्णयाचा आम्ही निषेध केला.
- अमोल मातेले, अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस (मुंबई).

युजीसी आणि केंद्र सरकार परीक्षांबाबत राजकारण करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. येत्या सात दिवसांत परीक्षा रद्द न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल. तरीही विद्यापीठांनी परीक्षा घेतल्यास परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका छात्रभारती आणि प्रहार विद्यार्थी संघटनेने घेतली आहे.
- मंजिरी धुरी, विद्यार्थी भारती संघटना.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News