बॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरूणीची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020
  • बँकेत आधी लिपिक आणि त्यानंतर उपव्यवस्थापक म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवून एका आरोपीने तरूणीकडून एक लाख रूपये घेतले.
  • विशेष म्हणजे, तिच्या माध्यामातून दुसऱ्याचीही त्याने फसवणूक केली.

नागपूर :- बॅंकेत आधी लिपिक आणि त्यानंतर उपव्यवस्थापक म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवून एका आरोपीने तरूणीकडून एक लाख रूपये घेतले. विशेष म्हणजे, तिच्या माध्यामातून दुसऱ्याचीही त्याने फसवणूक केली. परंतु ज्या मुलींची फसगत झाली आहे त्याच तरूणीवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

अश्विनी गुलाबराव ठवळे वय वर्ष २४ असे पीडित तरुणीचे नाव आहे. ती वर्धा जिल्ह्यातील काजळी तालुका कारंजा घाडगे येथील रहिवासी आहे. आज तिने पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार, वर्धा येथील सहयोग नगरातील रहिवासी असलेल्या आरोपी पंकज जयस्वाल याने तुला माझ्या बँकेत ३५ हजार रु. महिन्याची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. त्या बदल्यात आरोपी जयस्वालने अश्विनीकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर त्या जागा भरल्या आता पुन्हा उपव्यवस्थापक पदासाठी जागा निघाल्या, असे सांगून २० मार्च २०१८ ला तिला एक लाख पंचवीस हजार रुपये पगाराचे नियुक्तीपत्र दिले. बँकेत गेल्यानंतर ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे अश्विनीने ७ मार्च २०१९ ला कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर कारंजा जिल्हा वर्धा पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविली. पण त्यावर कारवाई झाली नाही. दरम्यान आरोपीने अश्विनीच्या माध्यमातून प्रतिभा नामक तरुणीकडून ही नोकरीच्या नावाखाली रक्कम घेतली. दोन वर्ष होऊनही नोकरी न मिळाल्याने प्रतिभाने अश्विनी विरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अश्विनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आपली रक्कम गेली आणि फसवणूक झाली. शिवाय आपल्याच विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ही दाखल झाल्यामुळे अश्विनी हादरली आहे.

पोलीस आयुक्तालयात धाव

गुन्हा दाखल झाल्यापासून आपल्या जवळचे कागदपत्र घेऊन अश्विनी न्यायासाठी इकडे तिकडे फिरत आहे. तिने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन आपली बाजूही मांडली आहे. दाद मिळत नसल्याचे पाहून तिने आज पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News