लग्नांचा ट्रेंड बदलतोय...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 January 2020

धार्मिक-लग्नकार्ये किंवा जत्रा-उरूस समाज संस्कृतीचे वाहक असतात. त्यामध्ये सतत बदल येतात आणि त्यांना स्वीकारत-नाकारत समाज पुढे जात राहतो. अलीकडच्या काळातील गावोगावच्या लग्न समारंभामध्ये होत  असलेले काही बदल हे समाजाच्या बदललेल्या अभिरुची-चालीरीतीचे दर्शन घडवतात.

लग्नपत्रिका घरोघरी जाऊन निमंत्रण देणे पूर्वी आवश्‍यकच असायचे. मात्र आता ई लग्नपत्रिकांचा काळ आला आहे. व्हॉटस्‌ॲप, मेलद्वारे पाठवलेली लग्नपत्रिकाही काही समाजामध्ये ग्राह्य मानली जाऊ लागली आहे. हे प्रमाण ग्रामीण भागात कमी असले तरी शहरांमध्ये चांगलेच फोफावले आहे. एकीकडे हे चित्र असताना लग्नपत्रिका अधिक महागड्या होत  असल्याचे चित्रही पुढे येत आहे. छपाई तंत्रज्ञानातील बदलांमुळे अशा आकर्षक आणि ज्यांचा फोटो फ्रेमसाठी पुनर्वापर होऊ शकेल अशा लग्नपत्रिका दिसू लागल्या आहेत. काहींनी पाऊच पाकिटांवरच लग्नाचे निमंत्रण छापले आहे. त्या पाऊचमुळे लग्नपत्रिकेची उपयुक्तता वाढली आहे.

लग्नपत्रिकेतील आशय आशयाच्यादृष्टीनेही लग्नपत्रिकांमध्ये बदल झाला आहे. पूर्वी लग्नपत्रिकेवर लग्न समांरभा विषयीचाच मजकूर छापला जात असत. मात्र आता सामाजिक संदेश देणाऱ्या लग्नपत्रिका दिसू लागल्या आहे. पूर्वी लग्नपत्रिकेवर स्वागतोत्सुक, कार्यवाहक, व्यवस्थापक असे लिहून समाजातील, गावातील प्रतिष्ठातांची नावे दिसायची. आता हे प्रमाण कमी झाले असून गावगाड्यात व्यक्ती मानसिक-आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्रपणे विचार करत असल्याचेही ते द्योतक आहे. त्याचवेळी गावगाड्यातील नाते-शेजारबंधाची वीण सैल झाल्याचीही ते लक्षण आहे.

प्रतिमा बदलल्यापूर्वी देवदेवतांचीच छायाचित्रे लग्नपत्रिकेवर असायची. आता मात्र देवदेवतांऐवजी आर्ट वर्क असलेल्या लग्नपत्रिकांचे प्रमाण वाढले आहे. शिवछत्रपतींची प्रतिमाही अलीकडे अनेक लग्नपत्रिकांमध्ये दिसत आहे. दिवंगत वाड-वडिलांचे फोटो तसेच वधू-वरांचे फोटोही लग्नपत्रिकेवर दिसत आहेत.

मेनू बदलला
लग्न म्हटले की गोडधोड भोजन आलेच. मात्र आता त्यातही व्हरायटी आली आहे. सांजा, जिलेबी पेक्षाही तालेवार कुटुंबे आता श्रीखंडपुरी, गुलाबजाम, रबडी, कटलेट, भजी, रसमलई, फ्रुटखंड, फ्रुटसॅलेड, बासुंदी असे गोड मेनू आले आहेत. शहरांमध्ये तर दाक्षिणात्य, उत्तरेतील खाद्यापदार्थाबरोबरच चायनीज मेनूही दिसू लागले आहेत. बफे पद्धतीला पसंती दिली जात आहे.

चौघड्याऐवजी डॉल्बी 
सनई- चौघडा, बॅंडपथकाची लग्नातील मागणी कमी झाली आहे. सनई चौघड्याची गरज बऱ्याचदा रेकॉर्डवरच भागवली जाते. काही वर्षांपूर्वी वरातील बेंजोचा आग्रह असायचा. आता ती जागा डी.जे.ने घेतली आहे. वराती पाणी पाऊचमधून उडवले जाणारे पाण्याचे फवारे जणू काही आपण शॉम्पेनच फोडत आहोत अशा आविर्भात त्याच सादरीकरण करून वरातीचा पुरतं वाटोळं करायचे प्रकार खेड्यात होत आहेत. औट गोळे, फटाक्‍यांऐवजी आता सेवनशॉट, टेन, टेवेन्टी शॉट सारख्या जमिनीवर आणि आकाशात उडणाऱ्या बॉम्ब- गोळ्यांनी मागणी घेतली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News