'या' दिवसी विजेच्या कडकडाटासह मुंबईत मुसळधार पाऊसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 June 2020

उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करून 3 जून रोजी ते उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याला धडकू शकते, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई : मुंबई शहर परिसरात येत्या 24 तासांत विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्‍यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे 3 व 4 जूनला मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता असून त्यामुळे सध्या उन्हाने आणि गर्मीने हैरान झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील पूर्वानुमान नोंदवले असून त्यानुसार 3 व 4 जूनला पालघरमध्ये अति मुसळधार तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या 24 तासांत हा कमी दबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. हे वादळ उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करून 3 जून रोजी ते उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याला धडकू शकते, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

रविवारी मुंबईतले हवामान कोरडे होते. रविवारी सकाळी किमान तापमानाची कुलाबा येथे 29.5 आणि सांताक्रूझ येथे ही 29.5 अंश सेल्सियस अशी नोंद करण्यात आली. त्यापूर्वी कुलाबा येथे मे महिन्यात 2010 मध्ये 29.7 अंश सेल्सिअस, 2015 मध्ये 29.7 आणि 2016 मध्ये 29.2 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी कुलाबा येथे नोंदवण्यात आलेले किमान तापमान मागील दहा वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान होते. रविवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान 35.8 अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे 35.7 अंश सेल्सिअस अंश नोंदवण्यात आले.

मच्छीमारांसाठी धोक्‍याचा इशारा

मुंबई सरासरी आर्द्रता सांताक्रध येथे 54 तर कुलाबा येथे 72 ट्‌कके होती. येत्या 24 तासात लक्षद्वीप आणि त्याजवळील समुद्र खवळलेला राहील. 2 जून रोजी कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राचा किनाऱ्याजवळ उंच लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. 3 जून रोजी गुजरात व महाराष्ट्र किनाऱ्याजवळील समुद्र खवळलेला राहिल. त्यामुळे येत्या चार दिवसात मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये. खोल समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी आपल्या बोटीसह किनाऱ्याला परतण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News