आयपीएल संघ फ्रॅंचाईजसमोर भारतीय खेळाडूंना तयार करण्याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली असल्याची अधिकृत घोषणा झाल्यामुळे आयपीएल संघांच्या फ्रॅंचाईज सुखावल्या आहेत आणि त्यांनी संघांच्या भारतातील सराव शिबिराची पूर्वतयारी सुरू केली आहे.

मुंबई: विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली असल्याची अधिकृत घोषणा झाल्यामुळे आयपीएल संघांच्या फ्रॅंचाईज सुखावल्या आहेत आणि त्यांनी संघांच्या भारतातील सराव शिबिराची पूर्वतयारी सुरू केली आहे. अमिरातीत विलगीकरणाची सक्ती नसल्यामुळे फ्रॅंचाईजी भारतातील शिबिरासच प्राधान्य देण्याचा विचार करीत आहेत.

आयपीएलमध्ये भारतातील खेळाडूंबरोबरच इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू असतात. भारतातील खेळाडू सोडल्यास अन्य ठिकाणी संघाचा सराव सुरूही झाला आहे. त्यामुळे आयपीएल संघ फ्रॅंचाईजसमोर भारतीय खेळाडूंना तयार करण्याचे आव्हान असेल. त्याच वेळी भारतीय संघाच्या सराव शिबिराची चर्चा सुरू आहे. त्यामुळे देशातील अव्वल खेळाडू त्या निमित्ताने सरावात येतील. फ्रॅंचाईज त्यामुळे अन्य खेळाडूंचा सराव ऑगस्टच्या अखेरपासून सुरू करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा सराव भारतातच होण्याची शक्‍यता आहे.

एमिरेटस्‌ एअरलाईन आणि एतेहाद एअरवेज या अमिरातीमधील प्रमुख विमान कंपन्यांची सेवा नियमितपणे सुरू झाली आहे. त्याचबरोबर अमिरातीमध्ये विलगीकरणाची सक्ती नाही. तिथे जाणाऱ्या प्रत्येकास अल्होसेन यूएई हा ऍप डाऊनलोड करणे भाग असते. भारतातील आरोग्य सेतूसारखाच हा ऍप आहे. तिथे जाणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावर तपासणी करतात आणि कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास विलगीकरणाची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे तिथे जाणाऱ्या संघांवर विलगीकरणाची सक्तीही नसेल.

भारतीय क्रिकेट मंडळ आयपीएल संघाच्या फ्रॅंचाईजना सातत्याने माहिती देत आहे. त्यामुळेच कोलकता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने संघांच्या अमिरातीमधील मुक्कामाबाबत पूर्वतयारीही सुरू केली आहे. त्याचबरोबर संघांनी शिबिराबाबतही चाचपणी सुरू केली आहे. ऑगस्ट तसेच सप्टेंबरमधील हवामान लक्षात घेऊन या शिबिराबाबत विचार केला जात आहे.

फ्रॅंचाईजचे अधिकारी सध्या आयपीएलचा नेमका कालावधी काय असेल, भारतीय संघाच्या शिबिराबाबत काय ठरले आहे, याचा फारसा विचार करीत नाहीत. आयपीएल अमिरातीत घेण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असेल. याबाबतचा निर्णय केवळ केंद्रीय क्रीडा मंत्रालयच घेणार नाही, तर या प्रक्रियेत गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका निर्णायक असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News