महिलांमध्ये सिझेरियनचा वाढता ट्रेंड धोक्याचा?

नेत्वा धुरी
Monday, 22 April 2019

सिझेरियन हा प्रसूतीचा शेवटचा पर्याय. मात्र आजकाल पहिली प्रसूती असो वा दुसरी प्रसूती; सिझेरियनचा पर्याय सर्रास स्वीकारलेला दिसतो. यामागे कधी प्रसूतीविषयी असलेले अनेक समज-गैरसमज, नको असलेल्या प्रसूतीकळा, दोन प्रसूतींसाठी येणारा खर्च आणि तुम्ही उपचार घेत असलेले प्रसूतितज्ज्ञ अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे सध्या हा ट्रेंड वाढत चाललेला दिसतो. मात्र सिझेरियन करावं की नाही, हा निर्णय गर्भवतीच्या अनेक शारीरिक क्षमता तपासून मगच घेतला जात असल्याचे प्रसूतितज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 

सिझेरियन हा प्रसूतीचा शेवटचा पर्याय. मात्र आजकाल पहिली प्रसूती असो वा दुसरी प्रसूती; सिझेरियनचा पर्याय सर्रास स्वीकारलेला दिसतो. यामागे कधी प्रसूतीविषयी असलेले अनेक समज-गैरसमज, नको असलेल्या प्रसूतीकळा, दोन प्रसूतींसाठी येणारा खर्च आणि तुम्ही उपचार घेत असलेले प्रसूतितज्ज्ञ अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे सध्या हा ट्रेंड वाढत चाललेला दिसतो. मात्र सिझेरियन करावं की नाही, हा निर्णय गर्भवतीच्या अनेक शारीरिक क्षमता तपासून मगच घेतला जात असल्याचे प्रसूतितज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

खासगी रुग्णालयांत महिला प्रसूतीसाठी दाखल झाली की, तिची सिझेरियन प्रसूतीच होते, असंच चित्र सगळीकडे पाहायला मिळतं. त्यात आपल्याकडे पहिली प्रसूती सिझेरियन झाली की दुसरी प्रसूतीही सिझेरियनच होणार, असा काहीसा सूर असतो किंवा महिलांचा ठाम समज असतो. म्हणूनच दुसऱ्या वेळीही सिझेरियनच करा असा अट्टहासही आता गर्भवतींकडूनच होत असल्याचे प्रसूतितज्ज्ञ सांगतात. पण खरंच सिझेरियन प्रसूती दुसऱ्यांदा करायला हवीच का, यासाठी गर्भवतीची शारीरिक क्षमता आहे का, तसंच बाळाची गर्भातील अवस्था या सगळ्या गोष्टी तपासून बघाव्या लागतात. त्यानंतरच गर्भवतीची कोणत्या प्रकारे प्रसूती केली जाणार याचा सर्वस्वी निर्णय घेतला जातो. म्हणूनच दुसऱ्यांदाही सिझेरियनच प्रसूती होते, हा निव्वळ चुकीचा समज असल्याचे प्रसूतितज्ज्ञ सांगतात. इतकंच नाही; तर आजकाल तर प्रसूतिकळांचा त्रास सहन करण्यापेक्षा झटपट सिझेरियन प्रसूती करून स्वतःला मोकळे करण्याकडे कल जास्त वाढत असल्याचे निरीक्षण स्त्री-रोगतज्ज्ञ नोंदवत आहेत.

अमेरिका तसेच इतर पौर्वात्य देशांमध्ये सिझेरियनची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. भारतातही आता सिझेरियन प्रसूती हा आता ट्रेण्ड रुजल्याचे चित्र असताना खरंच कळा सहन होत नसलेल्या गर्भवतीची थेट सिझेरियन प्रसूती करणं आवश्‍यक आहे का, असा प्रश्न आता गायनॉकॉलॉजिस्ट संघटनांकडून चर्चिला जात आहे. अर्थात खासगी रुग्णालयांतील आर्थिक गणितं सांभाळण्यासाठी सिझेरियन प्रसूती ही हमखास सुचवली जात असली, तरीही मुळात डॉक्‍टर निवडतानाही एकदा विचार करा, असे आवाहन गायनॉकॉलॉजिस्ट संघटना करतात.

मुळात गर्भवतींकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता कित्येकदा रुग्ण हातातून [N१]  निसटू नये म्हणून मागणी येताच थेट शस्रक्रियेसाठी नेतात. या सर्वांत आता महिलांमध्येच जनजागृती करण्याचा निर्णय काही स्त्री-रोगतज्ज्ञांनी घेतला आहे. यात सिझेरियन प्रसूती कोणत्या वेळी आवश्‍यक आहे, त्यामागील कारणे, शिवाय महिलांनी गर्भधारणेअगोदरच; तसेच गर्भारपणात  कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती 
दिली जात आहे.

महिलेची प्रसूती जागा छोटी असेल तर पहिल्या गर्भारपणात सिझेरियन प्रसूती केल्याशिवाय पर्याय नाही; परंतु हीच परिस्थिती दुसऱ्या गर्भारपणातही तशीच राहील असे नसते, अशी माहिती प्रसिद्ध प्रसूतितज्ज्ञ आणि मुंबई गायनॉकॉलॉजी सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. बिपिन पंडित देतात. गर्भाशयातील पाणी कमी झाल्यास, बाळाची पोझिशन आडवी झाल्यास किंवा गर्भवतीचा रक्तदाब वाढल्यास सिझेरियन प्रसूती करावीच लागते. परंतु या समस्या दुसऱ्या गर्भारपणात होतातच असे नाही, असेही डॉ पंडित म्हणाले. दुसऱ्या गर्भारपणात सिझेरियन प्रसूतीची शक्‍यता केवळ चाळीस टक्केच असते; त्यामुळे दुसरे गर्भारपण, प्रसूती याबाबत भीती मनात बाळगू नये, असे आवाहनही ते करतात. नैसर्गिक प्रसूतीमध्येही कळांचा त्रास कमी होण्यासाठी आधुनिक इंजेक्‍शन्स आली आहेत.

त्यामुळे प्रसूतीच्या कळाही आता कमी वेदनादायी होऊ लागल्या आहेत. हा खर्चिक मामला असला तरीही नैसर्गिक प्रसूतीसाठी हा पर्याय नक्कीच स्वागतार्ह आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे सिझेरियन प्रसूती वेदनारहित झाली आहे. तसंच सिझेरियन प्रसूतीमुळे कायमचे पाठीचे दुखणे सोसावे लागते यामागे केवळ शरीरातील कॅल्शियमचे कमी झालेले प्रमाण कारणीभूत असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगितले जात आहे.

वेदना टाळण्यासाठी झटपट मोकळे होण्यासाठी सिझेरियन प्रसूतीचा मार्ग चुकीचाच असल्याचे आजही वैद्यकीय क्षेत्राचे ठाम मत आहे. न टाळता येणाऱ्या समस्या उद्‌भवल्यास सिझेरियन प्रसूती करा, परंतु हमखास पर्याय नैसर्गिक प्रसूतीलाच द्या, असे आवाहन डॉक्‍टर्स करत आहेत. त्यासाठी मुळात डॉक्‍टरांनीही नैसर्गिक आणि सिझेरियन प्रसूतीला एकसमान दर आकारला तर कदाचित या समस्येचे निराकरण होईल, असेही डॉ. पंडित यांनी सुचवले आहे.
netva.dhuri@esakal.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News