आयपीएल अमिरातीत घेण्यास केंद्र सरकारची मंजुरी ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020

आयपीएल अमिरातीत घेण्यास केंद्रीय क्रीडा खात्याने मंजुरी दिली होती; मात्र केंद्रीय गृहमंत्रालय तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मंजुरी आवश्‍यक होती.

मुंबई:  आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने लीग अमिरातीत घेण्यास मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात आले; मात्र त्याच वेळी याबाबतचे औपचारिक पत्र लवकरच येणार असल्याचे सांगण्यात आले. याच बैठकीत महिलांची चॅलेंजर चार संघात घेण्याचे ठरवण्यात आले. त्याचबरोबर लीगमधील लढती पारंपरिक आठऐवजी साडेसातला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

आयपीएल अमिरातीत घेण्यास केंद्रीय क्रीडा खात्याने मंजुरी दिली होती; मात्र केंद्रीय गृहमंत्रालय तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मंजुरी आवश्‍यक होती. त्याच वेळी या निर्णयात आरोग्य मंत्रालयाचाही सल्ला घेतला जाणार होता. आता या लीगला केंद्रातील सर्व मंत्रालयांनी अनुकूलता दर्शवली आहे. त्याची औपचारिकता काही दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे अमिरातीचा व्हिसा मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचनाही फ्रॅंचाईजना दिली असल्याचे समजते.

आयपीएल अमिरातीत नेताना अखेर स्टार इंडियाची ही लीग लवकर सुरू करण्याची मागणी मान्य झाली आहे. स्टार इंडियाने दिवाळीच्या कालावधीपर्यंत लीग नेण्याची सूचना केल्यामुळे अंतिम लढत रविवार, 8 नोव्हेंबरऐवजी 10 नोव्हेंबरला घेण्याचे ठरले. त्याचबरोबर लढती 8 ऐवजी 7.30 वाजता सुरू करण्याचे ठरले आहे. स्टार इंडिया 7 साठी आग्रही होते; पण काही फ्रॅंचाईजचा त्याला विरोध होता. अखेर 7.30 वर तडजोड झाली.

जैवसुरक्षित वातावरणात लीग होणार आहे; तसेच प्रवास लक्षात घेता, सामन्यांत संघांना पुरेशी विश्रांती आवश्‍यक आहे. त्यामुळे 10 नोव्हेंबरला अंतिम लढत घेण्याचे ठरले, असे भारतीय मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

अन्य महत्त्वाचे निर्णय
- दहा दिवस दोन लढती होणार
- प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतचा निर्णय अमिराती क्रिकेट मंडळाबरोबर चर्चा करून
- संघांची मर्यादा 24 जणांची असल्याची सूचना
- अतिरिक्त सपोर्ट स्टाफबाबत अंतिम निर्णय नाही

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News