ज्येष्ठ कलाकारांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने केला 'हा' खुलासा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • कोरोना संसर्गामुळे 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणासाठी सेटवर जाण्यासाठी मनाई करण्याचा निर्णय त्यांच्याबाबत भेदभाव निर्माण करणारा नसून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे

मुंबई : कोरोना संसर्गामुळे 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणासाठी सेटवर जाण्यासाठी मनाई करण्याचा निर्णय त्यांच्याबाबत भेदभाव निर्माण करणारा नसून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे, असा खुलासा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे; मात्र या निर्णयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे अवर सचिव प्रसाद महाजन यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. "मिशन बिगीन अगेन'च्या सरकारच्या मोहिमेत विविध सुरक्षा तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये 65 वर्षांवरील कलाकारांना सिनेमा आणि मालिकांच्या सेटवर जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाला 70 वर्षीय कलाकार प्रमोद पांडे यांनी ऍड. अशोक सरोगी यांच्यामार्फत याचिका करून आव्हान दिले आहे. न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर गेल्या सुनावणीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ तंदुरुस्त नागरिक बाहेर प्रवास करू शकतो. मग तो सेटवर का नाही जाऊ शकत, याचा खुलासा करण्याचे निर्देशही दिले होते. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून या निर्णयाचे समर्थन केले आहे.

कोव्हिड 19 बाबतीत आतापर्यंत प्रत्येक सरकारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचे निर्देश दिले आहेत. अत्यंत आवश्‍यक काम असेल तर किंवा तब्येत ठीक नसेल तरच घराबाहेर पडावे, असेही सुरक्षेच्या हेतूने सांगितले आहे. कोणालाही वगळावे किंवा भेदभाव निर्माण करावा हा निर्णयामागील हेतू नाही. ज्येष्ठांनी घरी राहून व्हिडीओ शूट किंवा मोबाईल व्हिडीओ ऍपमार्फत काम करण्याची परवानगी आहे. ते शक्‍य नसेल तर किमान सध्याच्या साथीच्या दिवसांत पर्यायी व्यवस्था करायला हवी, असे राज्य सरकारने म्हटले आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

केंद्राचेही निर्बंध
केंद्र सरकारनेही कामकाजाबाबत 65 वर्षांवरील व्यक्तींवर काही निर्बंध टाकले आहेत. केंद्र सरकारचे निर्बंध शिथिल झाल्यास राज्य सरकारही त्याचा स्वीकार करेल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. व्यक्ती सुदृढ असली तरी कोरोनाचा संसर्ग कशाप्रकारे होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ही सुरक्षा तत्त्वे आखली आहेत, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News