विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

#मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असे उपक्रम राबविणे खूप गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होते. त्यामुळे परीक्षेला मुले उत्साहाने सामोरे जातील. या कार्यक्रमामुळे पालकांना मुलांच्या अभ्यासाविषयी कसे सजग राहिले पाहिजे, याबाबत प्रबोधन झाले. ‘सकाळ’चा हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये होणे गरजेचे आहे.       
- शैलेश सांगळे, मुख्याधापक

नेरूळ : परीक्षेच्या नावाने विद्यार्थी व पालकांच्या मनात भीती निर्माण होते. सतत वर्षभर अभ्यास केल्यामुळे ही भीती आणखी बळावते. अनेकदा विद्यार्थांचा आत्मविश्वासदेखील कमी होतो; मात्र विद्यार्थांचा आत्मविश्वास कमी होऊ नये, त्यांनी उत्साहाने परीक्षेला सामोरे जावे, यासाठी नेरूळ येथील नूतन महाविद्यालयात शनिवारी  ‘सकाळ’तर्फे परीक्षेच्या उंबरठ्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी ब्रेन कन्संट्रेसीतर्फे मार्गदर्शक सिद्धेश गवस व पूजा गावडे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेला सामोरे जाताना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.  
विद्यार्थ्यांना ९ वी आणि १० वीच्या अभ्यासाचा तणाव येतो. त्याचबरोबर पालकांच्यादेखील मनात धाकधूक असते.

त्यावर कशी मात करावी, तणाव न घेता परीक्षेचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा, याशिवाय किती वेळ योगासने करावीत, किती वेळ झोप घेणे आवश्‍यक आहे, याबाबत मार्गदर्शकांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच खेळण्याचे प्रमाण आणि केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याच्या पद्धती अशा काही मौलिक सूचनादेखील दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षक एम. डी. पाटील, सुजाता मुंडे हेदेखील उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News