अमेरिकेतील ब्युकनंतर कॅडिलॅक ही दुसऱ्या क्रमांकाची जुनी कंपनी. १९०२ मध्ये हेन्री फोर्ड कंपनीच्या अवशेषांचा भाग म्हणून कॅडिलॅकची स्थापना झाली. १९०९ पासून ती जनरल मोटर्स कंपनीचा भाग आहे. मात्र, कॅडिलॅकला कोणाच्याही मदतीची गरज नाही. कारण कॅडिलॅकने त्याआधीच स्वत:ला लक्झरी कारच्या निर्मितीत सर्वोच्च ठिकाणी पोहोचवले होते. नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते आघाडीवर होते. कॅडिलॅकने वाहन उत्पादनातील आदर्श निर्माण केला. ब्रिटनमधील प्रतिष्ठेचा देवार चषक जिंकणारी ही अमेरिकेतील पहिली कंपनी ठरली.
कॅडिलॅकची १९०२ मध्ये हेन्री फोर्ड कंपनीच्या उर्वरित अवशेषांमधून निर्मिती झाली. फोर्डचा कंपनीतील गुंतवणूकदारांसोबत वाद झाला तेव्हा त्याने कंपनी सोडली. त्या वेळी गुंतवणूकदारांनी कंपनीतील यंत्र सामग्रीच्या विक्रीसाठी हेन्री लेलॅंड यांना आणले. लेलॅंड यांनी मालमत्ता विक्रीत मदत करण्याऐवजी गुंतवणूकदारांना एकल सिलिंडर इंजिनसह कारनिर्मिती करण्याचा सल्ला दिला आणि कॅडिलॅक ऑटोमोबाईल कंपनीचा उदय झाला. १९०२ मध्येच कॅडिलॅकची पहिली कार दाखल झाली. छप्पर नसलेली आणि चार चाकांवर बोट वाहून नेतात त्याप्रकारे या कारची रचना केलेली होती. त्यात दोन आसने आणि १० अश्वशक्तीचे इंजिन वापरण्यात आले होते. कंपनीने १९०३ मध्ये ही कार न्यूयॉर्क ऑटो शोमध्ये सादर केली. या शोमध्ये या कारला लोकांनी इतकी पसंती दिली की, या मॉडेलच्या दोन हजार कार बनवण्याची ऑर्डर मिळाली. अनेकांना कंपनीच्या सुरुवातीचा इतिहास माहीत होता. त्यामुळे कॅडिलॅक कार इतर वाहनांच्या तुलनेत अधिक उत्तम आणि विश्वासार्ह ठरली.
१९०५ मध्ये कॅडिलॅक लेलॅंड आणि फॉकनरचे उत्पादन एकत्र करण्यात आले आणि ही कंपनी कॅडिलॅक मोटर कंपनी नावाने ओळखली जाऊ लागली. ही कंपनी संलग्न कारची निर्मिती करणारी पहिली कंपनी ठरली. त्यानंतर कंपनीने कायमच अव्वलस्थान राखले. १९१२ मध्ये कॅडिलॅक कंपनी अत्याधुनिक विद्युत प्रणालीचा वापर करणारी पहिली कंपनी ठरली. कंपनीने या काळात व्यावसायिक वापरासाठीही वाहने तयार केली. त्यात रुग्णवाहिका, व्यवसायासाठी वापरली जाणारी लिमोझीन, अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी कार आणि नेत्यांच्या ताफ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कारचा समावेश होता. ब्यूक, ओल्ड्समोबाईल, शेव्हरोल्ट या कारनंतर कॅडिलॅकचा क्रमांक लागत असल्याने जनरल मोटर्सचे व्यवस्थापन चिंतेत होते. त्यामुळे १९१५ मध्ये त्यांनी सादर केलेले व्ही ८ इंजिन ७० अश्वशक्ती निर्माण करणारे होते. त्यामुळे कारचा वेग आणखी वाढणार होता.
सरकारच्या विविध संस्थांमध्येही कॅडिलॅक कारचा वापर सुरू करण्यात आला. १९१७च्या दरम्यान लष्कराने मेक्सिकोच्या सीमाभागात पर्यटनासाठी कॅडिलॅककडे कारची मागणी केली. त्याचप्रमाणे पहिल्या महायुद्धाच्या काळात कंपनीने फ्रान्सला २३५० गाड्या पाठविल्या. त्यानंतर १९१८ मध्ये कॅडिलॅकने ‘ड्युअल प्लेन व्ही ८’ इंजिनची निर्मिती केली. कॅडिलॅक केवळ अमेरिकेतील सर्वांत प्रभावीच नाही, तर आवाज कमी करणारी कार म्हणून ओळखली जात होती. वाहननिर्मिती क्षेत्रात त्यामुळेच कॅडिलॅकने वेगळी ओळख निर्माण केली.
१९२८ ते १९३३ या काळात जागतिक वाहननिर्मिती उद्योगाची घसरण झाली. मात्र, लक्झरी कार सादर करणाऱ्या कंपन्यांनी मंदी नसल्याचे ठामपणे सांगितले. या काळात कॅडिलॅकची विक्री तब्बल ८४ टक्क्यांनी घसरली. मात्र, कॅडिलॅकने त्या काळातही बाजारपेठेतील स्थान सुरक्षित ठेवले. धोरणात बदल करून कॅडिलॅकने पुन्हा खप वाढविण्यात यश मिळविले आणि तो खप ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला. २००० नंतर कॅडिलॅकने कारच्या रचनेत मूलभूत बदल केले. एक्सएलआर रोडस्टरसारख्या कारमुळे तरुणाईला नक्कीच भुरळ पडली. क्रॉसओव्हर, एसयूव्ही या नव्या बदलामुळे कॅडिलॅकची लोकप्रियता आणखी वाढली.