उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

कोविड काळात सर्वत्र आर्थिक संकट,आरोग्य समस्या, बेरोजगारीची समस्या असतांना महानिर्मिती कंपनी या माध्यमातून ७१६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देत आहे ही निश्चितच अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बाब असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

नागपूर २७ ऑगस्ट : महानिर्मिती सरळसेवा जाहिरात क्र.०४/२०१९ अंतर्गत तंत्रज्ञ-३ या पदाच्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे रिक्त पदांची उपलबद्ध संख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण विचारात घेवून कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे.
 
सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा विचार करता, महानिर्मितीच्या मुंबई, पोफळी, पुणे, भुसावळ, चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी, नाशिक, पारस आणि परळी वीज केंद्राच्या संबंधित कार्यालयात २ सप्टेंबर २०२० पासून ह्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे. उमेदवारांनी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाऊन आपली कागदपत्रे तपासणी नेमकी कोणत्या कार्यालयात, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळात होणार आहे याची खातरजमा करून घ्यावी. महानिर्मितीकडून उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आय.डी.वर तसेच एस.एम.एस.द्वारे ह्याबाबतची सूचना देखील  देण्यात आली आहे.  तंत्रज्ञ-३ पदाच्या सुमारे ७१६ उमेदवारांची कोविड-१९ नियमांचे पालन करून कागदपत्रे तपासणी करण्यात यावी असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश आहेत.

कोविड काळात सर्वत्र आर्थिक संकट,आरोग्य समस्या, बेरोजगारीची समस्या असतांना महानिर्मिती कंपनी या माध्यमातून ७१६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देत आहे ही निश्चितच अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बाब असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

कागदपत्रे तपासणीकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेला अर्ज, त्यांची मूळ कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वसाक्षांकित (Self Attested) केलेला एक छायांकित संच (One Zerox copy set) कागदपत्रे पडताळणी अनुषंगाने जमा करणेकरीता स्वत:जवळ बाळगावा. तसेच आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे घेऊनच उमेदवाराने कागदपत्रे तपासणी करण्याकरीता त्यांच्या नावासमोर नमूद कार्यालयात, नेमून दिलेल्या दिवशी व वेळेवर उपस्थित रहावे. सोबत शारीरिक तथा वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे एम.बी.बी.एस. डॉक्टरकडून प्रमाणित केल्याचे मूळ फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.  कागदपत्रे जमा केल्यानंतर उमेदवारास संबंधित कार्यालयामार्फत पोच देण्यात येईल. नमूद दिनांक व वेळेत कागदपत्रे जमा करण्याकरीता उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत पुन्हा  दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. उमेदवाराने अर्जात नमूद केलेली कागदपत्रे सादर न केल्यास, उमेदवाराची निवड ताबडतोब रद्द करण्यात येईल.
 
तंत्रज्ञ-३ या पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीअंती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या  www.mahagenco.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे महानिर्मितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News