कॅमेरा मागचा मेंदू शोधणारा फोटोग्राफर

तुषार भद्रे
Monday, 3 June 2019

देशभरातून स्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत सातारच्या दृष्टी या शॉर्टफिल्मला सात हजार शॉर्टफिल्ममधून प्रथम क्रमांक मिळाला. या शॉर्टफिल्मचा छायांकनकार होता शार्दुल आफळे. चित्रकला व फोटोग्राफी कलेचा पाठपुरावा करीत शार्दुल आता डायरेक्‍टर ऑफ फोटोग्राफी ही ओळख निर्माण करतो आहे. शार्दुलचा हा प्रवास नक्कीच अनेकांना दिशादर्शक आहे. 

देशभरातून स्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत सातारच्या दृष्टी या शॉर्टफिल्मला सात हजार शॉर्टफिल्ममधून प्रथम क्रमांक मिळाला. या शॉर्टफिल्मचा छायांकनकार होता शार्दुल आफळे. चित्रकला व फोटोग्राफी कलेचा पाठपुरावा करीत शार्दुल आता डायरेक्‍टर ऑफ फोटोग्राफी ही ओळख निर्माण करतो आहे. शार्दुलचा हा प्रवास नक्कीच अनेकांना दिशादर्शक आहे. 

सद्य:स्थितीत प्रत्येक माणसाच्या हाती कॅमेरा आहे. सहज म्हणून आपण फोटो काढतो व पोस्ट करीत राहतो. कॅमेऱ्याच्या मागे एक डोळा असतो आणि त्या डोळ्यामागे मेंदू असतो, याचे भान ज्याला असते तोच खरा फोटोग्राफर! कारण फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफी ही अत्यंत विचारी व हुशार माणसाची कला आहे. छाया- प्रकाशाचे भान राखण्यासाठी संयम आणि मनाच्या एकाग्रतेची आवश्‍यकता असते. हे गुण ज्यांच्या ठायी असतात, ते छायाचित्रकार म्हणून नक्कीच नाव कमावतात. अर्थात हे झाले उपजतगुण पण या गुणांना शिस्तबद्ध शिक्षण, प्रशिक्षणाची जोड ही द्यावीच लागते. 

आज आपण अशाच एका छायाचित्रकाराची ओळख करून घेत आहोत, शार्दुल विनायक आफळे हे या ताज्या दमाच्या चित्र व छायाचित्रकाराचे नाव. शार्दुलचे प्राथमिक शिक्षण रहिमतपुरात झाले तर पुढील शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल व शाहूपुरी माध्यमिक शाळेत झाले. चित्रकलेत गती असल्याने त्याने पाटखळच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन फाउंडेशन कोर्स पूर्ण केला आणि डिप्लोमा व डिग्री पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय व डी. वाय. पाटील महाविद्यालयातून पूर्ण केली. रंग, रेषा, अवकाश व छाया, प्रकाश याचे भान या शिक्षणातून त्याला लाभले. पुण्यात बालगंधर्व कला दालनामध्ये कॉलेजच्या वतीने आयोजित प्रदर्शनात शार्दूलने दहिवडी येथील बैलगाडा शर्यती दरम्यान टिपलेले छायाचित्र प्रदर्शित केले होते. त्याला पुरस्कार मिळाला आणि शार्दुलचा आनंद द्विगुणित झाला. नवा आत्मविश्वास त्याला मिळाला. 

साताऱ्यात आल्यावर "आयडीबीआय'च्या प्रशिक्षण केंद्रातून फोटोग्राफीचे अधिक धडे त्याने उमेश निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले आणि आत्मविश्वासाला नवी झळाळी मिळाली. शार्दुलने मनोमन ठरवले आता आपलं इप्सित, ध्येय हे उत्तम फोटोग्राफर व्हायचे. याची बीजे नेमकी कशी व कोठे पडली, असे मी विचारले, तर शार्दुल म्हणाला, "मी पाचवीत असताना गणपतीपुळ्याला गेलो होतो. तेथील समुद्राच्या लाटा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मी छोटा कॅमेरा घेऊन पाण्यात उतरलो. पण, झाले भलतेच एक लाट आली आणि कमेऱ्यावरून गेली. कॅमेरा बादच झाला. मला आता आई, वडील, भाऊ रागावतील या भावनेने भयभीत झालो. पण, मला कोणीच रागावले नाही. हा प्रसंग आजच्या माझ्या या कलेला पुढे घेऊन जाणारा "टर्निंग पॉइंट" होता असे आज मागे वळून पाहताना वाटते. मी एखादी गोष्ट बघत नाही तर मनाच्या एकाग्रतेने पाहतो. पाहणे म्हणजे समजून घेणे असे मला वाटते आणि हाच माझ्यातील गुण पालकांनी हेरला असावा. 

शार्दुलचे पाहणे म्हणजे समजून घेणे हे वाक्‍य खरोखरीच खूप महत्त्वाचे आहे. या कलेत कोणाला गुरू मानतोस या प्रश्नावर शार्दुल सातारचे चित्रकार व शिक्षक शेखर हसबनीस सरांचे नाव घेऊन म्हणाला, ""मला शालेय जीवनापासून आजपर्यंत ते मार्गदर्शन करीत आहेत व त्यांचे मार्गदर्शन ही माझ्यातील कलाकाराची शिदोरी आहे, जी मला आयुष्यभर पुरतच राहणार आहे.'' असा गुरू लाभणे व मुलातील उत्तम सवयी व गुण हेरणारे पालक ज्यांना लाभतात, त्या मुलांना त्यांचे आकाश गवसतेच! 
शार्दुलच्या जीवनातील आणि एक महत्त्वाचा "टर्निंग पॉइंट' म्हणजे त्याची गाठ साजीद शेख यांच्याशी पडली व सिनेमॅटोग्राफर म्हणून त्याला संधी मिळाली. त्यांच्यासोबत ब्रेनडेड, आक्रोश, दहा बाय दहा अशा शॉर्टफिल्म्स त्याने केल्या तर प्रशांत पांडेकर यांच्यासोबत काम करताना त्याचे अनुभवविश्व व्यापक झाले. सातारचेच लेखक, दिग्दर्शक जमीर आत्तार यांच्या चिपळूण येथे शूट झालेल्या आई माझे पत्र हरवले या शॉर्टफिल्मला मुंबईच्या संस्कृती कला दर्पण महोत्सवात छायांकनाकरिता शार्दुलला नामांकन मिळाले.

त्याच्यातील सिनेमॅटोग्राफर म्हणून असलेल्या क्षमतेला लाभलेला तो मानाचा तुराच होता. दरम्यान, भारत सरकारने स्वच्छता अभियानांतर्गत एक शॉर्टफिल्म स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेत प्रशांत पांडेकर व जमीर अत्तार यांनी भाग घेऊन दृष्टी या शॉर्टफिल्मची निर्मिती केली. सिनेमॅटोग्राफर होता, शार्दुल आणि या फिल्मला सात हजार फिल्ममधून प्रथम क्रमांक मिळाला. दिल्ली येथे याचे पारितोषिक वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शार्दुल तिथे हजर होता, हाच क्षण त्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. शार्दुलने गाव लई झ्याक सिझन 1 तर कंदी पेढे, मुलगी आणि मज्जा या वेबसिरीजही केल्या आहेत, करतो आहे आणि आता घोडा या सिनेमाच्या प्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा आहे. 

खूप नवे तंत्र आत्मसात करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेऊन सातारचे नाव मोठे करायचे आहे, हे स्वप्न उराशी बाळगून शार्दुल मेहनत घेतो आहे. डिरेक्‍टर ऑफ फोटोग्राफी (डिओपी) व सिनेमॅटोग्राफर यातील फरक शार्दुलने जाणला आहे. त्याचा प्रवास आता डिओपी म्हणून बहरत जाणार आहे...त्यास खूप शुभेच्

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News