ऑनलाईन सिगरेट खरेदी तरुणांना महागात; पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020
  • लॉकडाऊनमध्ये व्यसनाची साधने मिळणे कठीण झाले होते. सिगारेट यांसारख्या वस्तू तर दुप्पट किमतीला विकून दुकानदार आपले खिसे भरत होते.
  • अशाच काळात सिगारेट खरेदी करण्यासाठी दुकानदारांना ऑनलाईन पैसे पाठवण्याचे बनावट संदेश पाठवून फसवणूक करणाऱ्या पाच महाविद्यालयीन तरुणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई :- लॉकडाऊनमध्ये व्यसनाची साधने मिळणे कठीण झाले होते. सिगारेट यांसारख्या वस्तू तर दुप्पट किमतीला विकून दुकानदार आपले खिसे भरत होते. अशाच काळात सिगारेट खरेदी करण्यासाठी दुकानदारांना ऑनलाईन पैसे पाठवण्याचे बनावट संदेश पाठवून फसवणूक करणाऱ्या पाच महाविद्यालयीन तरुणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

जिमित पाचांळ (20), अपूर्व गोहिल (22), भाविक पडियार (22), सागर गाला (24), निसर्ग मस्करिया (19) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे पाच जण ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका दुकानदाराकडून नियमित सिगारेट घ्यायचे, मात्र लॉकडाऊनमुळे दुकानदार सिगारेटची पाकिटे महाग विकत होता. तेवढे पैसे यांना देणे परवडत नसल्यामुळे जून महिना येईपर्यंत त्यांचा खिसा मोकळा झाला होता. मात्र सिगारेटच्या व्यसनापायी अखेर त्यांनी दुकानदारांना गंडावण्याची नामी युक्ती शोधून काढली. सिगारेटचे पैसे दुकानदाराला पेटीएममवर पाठवतो, असे सांगून वेगवेगळ्या मोफत संकेतस्थळावरून बनावट संदेश तयार करून, विक्रेत्यांच्या मोबाईलवर रक्कम पाठविल्याचा संदेश पाठवण्यास या तरुणांनी सुरुवात केली. कामाच्या गडबडीत दुकानदारही पैसे आल्याचा संदेश पाहून त्यांना सिगारेट देत होते.

पासबुकच्या इंट्रीमुळे गुन्ह्याची उकल

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ज्या वेळी दुकानदार बॅंकेत पासबुकची इंट्री केली. त्यावेळी त्या मुलांनी पाठवलेल्या पैशांची नोंद दिसून आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरोधात भा.दं.वि कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर, पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक तुषार सावंत आणि पोलिस हवालदार दयानंद साटम, लक्ष्मण बागवे, पोलिस नाईक विनोद माने, पोलिस शिपाई किरण बारसिंग, उमेश सोयंके, कमरुलहक शेख, मनीष सकपाळ आणि संग्राम जाधव यांच्या पथकाने उत्कृष्ट तपास करून या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News