बाळांना लगणाऱ्या खाद्य पदार्थांचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 April 2020

कर्मचारी कोरोनाच्या भीतीने कामावर येत नसल्याने बेबी फूड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन घटले.

मुंबई: वाढलेल्या लॉकडाऊनचा फटका बेबी फूडला बसला आहे. लॉकडाऊनमुळे बाहेरगावी गेलेले कर्मचारी तेथेच अडकले आहेत; तर काही कर्मचारी कोरोनाच्या भीतीने कामावर येत नसल्याने बेबी फूड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात बेबी फूडचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

बेबी फूडमध्ये ड्रायफ्रुट्‌स पावडर, प्रोटीन पावडर, मिल्क पावडर, सेरेलॅक्‍स अशा पदार्थांची विक्री कंपन्यांकडून केली जाते. अशा चार ते पाच मोठ्या कंपन्या सध्या आहेत; मात्र लॉकडाऊनमुळे कंपन्यांमधील काही कर्मचारीगावी गेले आहेत; तर काही लांब राहत असल्याने येत नाहीत आणि काही भीतीनेही कामावर येत नाहीत. त्यामुळे बाजारात गरज असतानाही उत्पादन घटून तुटवडा निर्माण झाल्याचे ऑल फूड ऍण्ड ड्रग लायसन्स होल्डरचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. दुकानांमध्ये बेबी फूड उपलब्ध नसून काही मोठ्या दुकानांमध्येच विक्रीसाठी आहे. पुढील काही दिवस बेबी फूडची उपलब्धता कमीच राहील असेही पांडे म्हणाले.

बेबी फूडमध्ये 10 हून अधिक प्रकार मिळतात; मात्र सध्या त्याचा तुटवडा आहे. कंपन्यांमधून मालाचा पुरवठा होत नाही. कंपनीमध्ये बेबी फूड आणण्यासाठी सकाळी 10 वाजता गेल्यावर 2 वाजेपर्यंत लाईनमध्ये उभे राहावे लागते. त्यामध्ये हवा तो आणि हवा तितका माल उपलब्धही होत नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात एफडीएला निवेदन केल्याचे अंधेरीतील स्टेट इंडिया फार्माचे हकीम कपासी यांनी सांगितले.

लहान बाळाला महिन्याला तीन ते चार पॅकेट वेगवेगळ्या प्रकारचे बेबी फूड लागते. मार्केटमध्ये बेबी फूड आणायला गेले असता अनेक ठिकाणी बेबी फूड नव्हते. एका दुकानात होते; मात्र तिथे भली मोठी रांग लागली होती. रांगेत उभे राहून बेबी फूड घेण्याशिवाय पर्याय नव्हता, शेवटी तब्बल दीड तास रांगेत उभे राहून बेबी फूड घेतले.
- दीप्ती आंनद, गृहिणी, अंधेरी

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News