ब्रेक सरावाला; तंदुरुस्तीस नव्हे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 April 2020
  • भारतीय क्रिकेटपटूंना ट्रेनर, फिझिओंची स्पष्ट सूचना, रोजचा आढावाही

नवी दिल्ली  कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा थांबल्या आहेत, पण तंदुरुस्तीपासून कोणताही ब्रेक नाही किंवा त्यातून कोणत्याही प्रकारची सुटका नाही असेच भारतीय क्रिकेटपटूंना सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचा फिटनेस रोज तपासलाही जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे ट्रेनर निक वेब तसेच फिझिओ नितीन पटेल क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचा आढावा ऍथलीट मॉनिटरिंग सिस्टीमच्या (एएमएस) मदतीने घेत आहे. भारतीय क्रिकेट मंडळाशी करारबद्ध असलेल्या सर्वच खेळाडूंना फिटनेस कार्यक्रम देण्यात आला आहे. त्याचबरोबर खेळाडूंची प्रगती, त्यांच्या आहारात, व्यायामातील बदल एएमएस ऍपच्या मदतीने लक्ष ठेवून सुचवले जात आहेत.

खेळाडूंच्या फिटनेसचे रोज विश्‍लेषण होत आहे. खेळाडूंनी आपली माहिती ऍपवर दिल्यावर निक तसेच नितीन त्याचे विश्‍लेषण करीत आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा आढावा रोज घेतला जात असताना अन्य कोणत्याही गोष्टीची गरज नाही, असे भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदधिकाऱ्यांनी सांगितले. खेळाडूंना निश्‍चित आहारातून माफक मुभा देण्यात आली आहे, त्यामुळे ते प्रसंगी गोड पदार्थांचा माफक आस्वाद घेऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.

खरे तर एएमएस ऍपमुळे आपण जास्त कॅलरी असलेले पदार्थ कधी खावे, कधी खाऊ नये हे खेळाडूंना कळते. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूस त्याची जबाबदारी ओळखून तंदुरुस्तीचा कार्यक्रम तयार करून देण्यात आला आहे. फलंदाजांना खांदे आणि मनगटात ताकद येईल यादृष्टीने व्यायाम प्रकार सांगितले आहेत, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय संघातील सर्व खेळाडू पूर्णपणे व्यावसायिक आहेत. ब्रेक आहे, त्यामुळे खाण्यावर आडवा हात मारण्याचा ते विचारही करणार नाहीत. विराट कोहलीने संघात तंदुरुस्तीचे महत्त्व चांगलेच रुजवले आहे. एखाद्या वेळी काही प्रमाणात आहार नियमाचा भंग चालू शकतो, पण तंदुरुस्तीसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.
- भारतीय मंडळातील वरिष्ठ पदाधिकारी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News