पवार कुटुंबाला शह देण्यासाठी भाजपच्या हाती हे ब्रह्मास्त्र?

दीपक रोकडे
Tuesday, 4 June 2019

देशात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव तथा कॉंग्रेसचे माजी नेते आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही आजोबा आणि वडिलांप्रमाणेच राजकारणातील सर्वाधिक चर्चेतील व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. 

देशात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव तथा कॉंग्रेसचे माजी नेते आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही आजोबा आणि वडिलांप्रमाणेच राजकारणातील सर्वाधिक चर्चेतील व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. 

विखे यांनी आज आमदारकीचा राजीनामा आज दिला असला, तरी ते भाजपच्या वाटेवर असल्याचे काही महिन्यांपासून लपून राहिलेले नव्हते. पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी कॉंग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा कॉंग्रेसला सोडली नाही, ही तात्कालिक कारणे त्यामागे आहेतच; शिवाय कॉंग्रेसमध्येच असलेले त्यांचे पारंपरिक विरोधक आणि पवार - विखे कुटुंबातील राजकीय द्वंद्व ही कारणेही सर्वश्रुत आहेत. त्यातच विखे कुटुंबाला नेहमी सत्ताधारी पक्षासोबत राहणे आवडते, अशी चर्चाही नेहमीच होते.

कॉंग्रेसतर्फेच 1971पासून सलग पाच वेळा खासदार झालेल्या बाळासाहेब विखे यांना कॉंग्रेसने 1991मध्ये मात्र उमेदवारी नाकारली, तेव्हा पहिल्यांदाच विखे कुटुंब कॉंग्रेसविरोधी झाले होते. त्यातच नगर मतदारसंघातील 1991ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. आरोप-प्रत्यारोप आणि न्यायालयीन लढाईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी विखे कुटुंबाचे कायमचे वैर निर्माण झाले. नंतर शिवसेनेकडून निवडणूक लढवून विखे पाटील 1998मध्ये नगर मतदारसंघातून आणि 1999मध्ये कोपरगाव मतदारसंघातून पुन्हा लोकसभेत गेले; मात्र त्याआधीच त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेतर्फेच विधानसभेत पोचले होते. केंद्रातील भाजप आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब अर्थ राज्यमंत्री झाले, त्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील राज्य मंत्रिमंडळात होते. पुढे 2004मध्ये पुन्हा कॉंग्रेस आघाडीचे सरकार आले, तेव्हा बाळासाहेब विखे आणि राधाकृष्ण विखे हे पिता-पुत्र कॉंग्रेसमध्ये परतले. राधाकृष्ण विखे अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. 2014मध्ये विधानसभेत भाजप सरकार आले, त्या वेळी त्यांना कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले. ते आजपर्यंत कायम होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे मनसुबे तीन वर्षांपूर्वीच जाहीर केले होते. त्यासाठी मतदारसंघात मोर्चेबांधणीपासून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोचण्याचे प्रयत्नही सुरू केले होते. जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला असलेला नगर मतदारसंघ कॉंग्रेसकडे मिळवून कॉंग्रेसतर्फेच ही निवडणूक लढवायची, हे त्यांनी नक्की केले होते. मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने डॉ. सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्याचीही तयारी दर्शविली. मात्र हाप्रस्तावही राष्ट्रवादीने धुडकावल्याने डॉ. सुजय भाजपकडे गेले. नगर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या विखे कुटुंबातील सदस्य कॉंग्रेसपासून दुरावत असल्याने भाजपनेही त्यांचे स्वागत केले आणि उमेदवारीही दिली. डॉ. सुजय
मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाले. तत्पूर्वीच राधाकृष्ण विखे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दिला होता. दरम्यान, नगर मतदारसंघातील मतदानप्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे अप्रत्यक्षपणे जाहीरही केले होते. डॉ. सुजय यांच्या विजयानंतर त्यांचा भाजप प्रवेश केवळ औपचारिकताच राहिल्याचे सांगितले जात होते. आज आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांचा भाजपप्रवेश आता नक्की झाल्याचे मानले जात आहे.

विखे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर आणि संभाव्य भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात आमदार बाळासाहेब थोरात हेच एकमेव बलाढ्य नेते कॉंग्रेसकडे शिल्लक राहतील. त्यातच सख्खे शेजारी असलेले विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैर आता तीव्र स्वरूप घेण्याचीच दाट शक्‍यता आहे. आधी केंद्रीय नेतृत्वाच्या भीतीपोटी, कॉंग्रेसच्या "भल्यासाठी' एका व्यासपीठावर येणारे हे नेते आता कायम एकमेकांकडे पाठ करूनच उभे राहतील, यात शंका नाही. याआधी एकमेकांच्या विरोधात केवळ वाक्‍बाण सोडणारे हे दोन्ही नेते आता उघड-उघड परस्परविरोधी प्रचार करायला मोकळे होणार आहेत.

आता भाजपमध्ये प्रवेश करताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार यात शंका नाही. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे समजते. गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्याने तेथील पालकमंत्रिपद रिक्त झाले आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद विखे यांना देऊन भाजपला दुहेरी चालही खेळता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबाला शह देण्यासाठी विखे यांच्या रूपाने भाजपच्या हाती ब्रह्मास्त्र आल्याचे मानले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News