प्रेमविवाह केल्यामुळे मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020

दोन्ही बाजूनी पुन्हा लग्न लावून देण्याची पालकांनी तयारी दाखवल्यानंतर मुलगी घरी गेली होती. परंतु नंतर लग्न लावणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनीही तिथून पळ काढला होता.

प्रेमविवाह केल्यामुळे मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण

घराशेजारील मुलीला पळवून नेऊन मुलाने लग्न केल्यामुळे मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यातील भाळवणी येथे घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणा-या व्यक्तींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

भाळवणीतील एका तरूणाने घराशेजारी राहणा-या तरूणीला पळवून नेले आणि लग्न केले. या घटनेचा राग भावकीला आणि मुलीच्या नातेवाईकांना असल्यामुळे त्यांनी मुलाच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरूवात केली. साधारण तीन किलोमीटरपर्यंत ही मारहाण केली. त्यानंतर गावाच्यामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला वडिलांना बांधून मारहाण करण्यास सुरूवात केली.

मारहाण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. गावातील सध्याचं वातावरण तणावपुर्ण असून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील चौघांना मारहाण प्रकरणी ताब्यात घेतले असून इतर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी सांगितली.

या प्रकरणात मुलगा आणि मुलगी हे दोघेही वेगळ्या समाजातील आहेत. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केले आणि पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यावेळी दोन्ही बाजूनी पुन्हा लग्न लावून देण्याची पालकांनी तयारी दाखवल्यानंतर मुलगी घरी गेली होती. परंतु नंतर लग्न लावणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनीही तिथून पळ काढला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News