बॉक्सिंग महासंघाची नियमावली जाहीर; या वयोगटातील प्रेक्षकांना प्रवेश बंदी
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने खेलो इंडिया - फिर से ही नियमावली अंमलात आणण्याची सूचना सर्व क्रीडा महासंघांना केली आहे.
नवी दिल्ली: भारतीय बॉक्सिंग महासंघाने सराव शिबिरे तसेच स्पर्धांसाठी नवी नियमावली तयार केली आहे. त्यात 60 वर्षावरील व्यक्तीस स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर स्पर्धा तसेच शिबिर वातानुकूलित ठिकाणी न घेता हवा वाहती राहील, अशा बंदिस्त ठिकाणी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने खेलो इंडिया - फिर से ही नियमावली अंमलात आणण्याची सूचना सर्व क्रीडा महासंघांना केली आहे. त्यानंतर भारतीय बॉक्सिंग महासंघाने 19 पानी स्पर्धा नियमावली तयार केली आहे. त्यातीलच एका पानात स्पर्धां संयोजनाबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्पर्धेच्या ठिकाणी प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नाही. स्पर्धेच्या ठिकाणी कमीत कमी लोकांना प्रवेश देण्यात यावा. तसेच कमीत कमी स्वयंसेवक तसेच सहाय्यकांना प्रवेश देण्यात यावा, असे बॉक्सिंग महासंघाने सांगितले आहे. त्याचबरोबर स्पर्धा होणार असलेल्या सभागृहाच्या खिडक्या तसेच दरवाजे खुले असावेत, ज्याद्वारे स्पर्धेच्या ठिकाणी हवा खेळती राहील. स्पर्धेच्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा नसावी; तसेच एअर कर्टन्सही नसावेत. यामुळे एरोसोल्स तयार होतात. त्यामुळे धा होण्याचे प्रमाण वाढते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
साठ वर्षावरील व्यक्तींनाही स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश नसेल. त्यांना रोगाची लागण होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांना बाधा जास्त वेगाने होईल, याकडेही महासंघाने लक्ष वेधले आहे. दरम्यान, भारतीय बॉक्सिंग महासंघाने कोणत्याही स्पर्धेची घोषणा केलेली नाही; पण राष्ट्रीय स्पर्धा ऑक्टोबर अथवा नोव्हेंबरमध्ये घेण्याचा विचार आहे. त्यानंतर आशियाई स्पर्धा डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे.
बॉक्सिंग स्पर्धेबाबतची नियमावली
- स्पर्धेच्या ठिकाणांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण
- स्पर्धा प्रवेशाच्या ठिकाणी जंतुनाशक मार्ग करण्याची सूचना
- स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येकाचे तपमान पाहणे
- बॉक्सरनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे; तसेच त्यांना कोरोनाचा विमा काढण्याची सूचना
- खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी स्वतंत्र रूम
- भोजनासाठी एकत्रित व्यवस्था नको, त्याऐवजी जेवणाची पाकिटे
- स्पर्धा संयोजकांनी स्थानिक रुग्णालयांसह करार करणे
- स्पर्धेदरम्यान एखाद्यास कोरोनाची लागण आढळल्यास स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संबंधितांस कोरोना रुग्णालयात दाखल करणे
- स्थानिक प्रशासनाच्या मंजुरीनंतरच बॉक्सिंग सरावास मंजुरी