बॉक्सिंगपट्टू विकास आणि पूजा यांची टोकियावारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

थायलंडच्या या प्रतिस्पर्धीविरुद्ध मी प्रथमच खेळत होते. तिची लढत यापूर्वी कधीही बघितली नव्हती. त्यामुळे लढतीपूर्वी काहीसे दडपण होते. मार्गदर्शकांनी लढतीसाठी आखलेली व्यूहरचना मोलाची ठरली. त्यांनी माझा आत्मविश्‍वासही उंचावला होता. मार्गदर्शकांची योजना चांगल्या प्रकारे अमलात आणली, याचे मला समाधान आहे. 
- पूजा राणी

मुंबई : आशियाई विजेती पूजा राणी तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेत्या विकास क्रिशनने टोकियो ऑलिंपिक बॉक्‍सिंग स्पर्धेची पात्रता साध्य केली. आशियाई ऑलिंपिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत त्यांनी हे साध्य केले. सचिन कुमार उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला असला, तरी त्याला पात्रतेची अजून संधी आहे.
विकासने ६९ किलो गटात आशियाई उपविजेत्या सेवोन्रेत्स ओकाझावा याला पराजित केले. चौथ्या मानांकित पूजाने ७५ किलो गटाच्या लढतीत थायलंडच्या पोर्निपा छुटी हिला संधी दिली नाही. सचिन कुमार याला मात्र ८१ किलो गटात अनुभवी दॅक्‍सायांग चेन याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. सचिन चुरशीच्या लढतीत २-३ असा पराजित झाला. आता तो उपांत्यपूर्व फेरीतील पराजित प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्ले ऑफच्या लढती खेळून ऑलिंपिक पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करेल. 

पूजाने आंतरराष्ट्रीय महिलादिनी भारतीयांना ऑलिंपिक पात्रतेच्या तिकिटाची भेट दिली. ती टोकियोला पात्र ठरलेली भारताची पहिली बॉक्‍सर ठरली. तिने डाव्या आणि उजव्या हातांच्या जॅबचे सुरेख मिश्रण साधत प्रतिस्पर्धीस जेरीस आणले. तिची एकतर्फी हुकूमत पंचांनी ५-० असा निकाल देत मान्य केली. प्रतिस्पर्धी सुरुवातीस आक्रमक असल्याने पूजाने संयम राखला. तिने चांगला बचाव केला, त्यामुळे प्रतिस्पर्धी दडपणाखाली आली. त्याचा फायदा पूजाने घेतला.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेत्या विकासने तिसऱ्या मानांकित प्रतिस्पर्ध्यास ५-० असे हरवत आगेकूच केली. गुणफलक दाखवतो त्यापेक्षा लढत चुरशीची झाली. पहिल्या फेरीनंतर विकासची आघाडी निसटती होती; पण त्यानंतर विकासने बचाव आणि आक्रमणाचा चांगला संगम साधला. त्याने अचूक ठोसा देण्यासाठी योग्य प्रतीक्षा केली. मोक्‍याच्यावेळी अचूक स्ट्रेट पंच देत विकासने बाजी मारली. सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये खेळणारा तो भारताचा दुसरा बॉक्‍सर ठरला. यापूर्वी विजेंदर सिंगने ही कामगिरी केली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News