'या' दोनच स्पर्धा राष्ट्रीय क्रिकेट मोसमात होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

कोरोना महामारीच्या आक्रमणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेट मोसम जानेवारीपासून सुरू करण्याचे ठरवले आहे.

मुंबई: कोरोना महामारीच्या आक्रमणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेट मोसम जानेवारीपासून सुरू करण्याचे ठरवले आहे. एवढेच नव्हे, तर रणजी करंडक आणि विनू मंकड करंडक या दोनच स्पर्धा या मोसमात होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय मंडळाने दुलीप करंडक, देवधर करंडक या दोन स्पर्धांबरोबरच विजय हजारे करंडक, सी. के. नायडू करंडक (23 वर्षांखालील) या स्पर्धाही रद्द करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे; मात्र भारतात पुढील वर्षी अपेक्षित असलेली विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धा लक्षात घेऊन मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धा घेण्याचा विचार सुरू आहे.

रणजी करंडक स्पर्धा संघांचा जास्त प्रवास टाळण्यासाठी प्राथमिक फेरी विभागीय स्तरावर घेण्याचा विचार होत आहे. पाच विभागातील विजेत्यात बाद फेरीच्या लढती घेऊन विजेता संघ ठरवण्याचा विचार आहे. विनू मंकड ही 19 वर्षांखालील गटाची एकदिवसीय स्पर्धेचा कालावधी कमी करण्याबाबतही विचार सुरू आहे. रणजी करंडक तसेच विनू मंकड स्पर्धेतील विभागीय लढती बाद पद्धतीने घेण्याचा विचार आहे. महिला तसेच मुलींच्या क्रिकेट स्पर्धेबाबत अद्याप विचार झालेला नाही.

देशांतर्गत स्पर्धेतील सामन्यांची संख्या कमी झाल्यास त्याचा खेळाडूंच्या उत्पन्नावर परिणाम होईल. रणजी करंडक लढतीसाठी खेळाडूंना 1 लाख 40 हजार, विजय हजारे स्पर्धेसाठी 35 हजार तर सय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेसाठी 17 हजार 500 रुपये मानधन खेळाडूंना मिळत असते. हजारे तसेच मुश्‍ताक अली स्पर्धा रद्द झाल्यास मर्यादित षटकांच्या लढतीत खेळणाऱ्या खेळाडूंचे मोठे नुकसान होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News