पुस्तक, संकट आणि परिस्थिती हेच खरे गुरू...

शशी त्रिभुवन
Tuesday, 26 February 2019

आमचं जीवन आम्हालाच घडा- बिघडवायचं असा आततायी हट्ट नाहीये, पण पदव्यांच्या भेंडोळ्या स्वप्न धांडोळ्यात खऱ्या ठरत नसताना जगण्याचं शिक्षण अगदी खरंखुरं पाहिजे हो आम्हाला हे कोण अन कधी समजून घेणार?  एम.बी.ए. होऊन चहाची टपरी टाकायची, पोटासाठी धडपडताना 'ऍडमिनस्ट्रेशन ऑफ स्टमक' एवढेच खरं उरतं. 

उद्वेगाचे उत्साही अंगार बरसवण्याची हौस कुणाला आहे? पण तुमच्या प्रत्येक 'भरपेट' चर्चासत्रातील 'बेकारी'वरील चर्चा 'बेकरां'वर घसरते. शिकला पण शिकून अक्कल आली नाही, कामातून गेला, बहकला बिघडला आजचा तरूण हे तुमचं 'कॉमन आयडेंटिटी ऑफ युथ'विषयी 'कॉमन टाकिंग्ज!' प्रत्येक वेळचे तुमचे सुसाट बरळणे असेच घसरते ते थेट आमच्यावरच! तरुणांपुढे आदर्शच नाहीत हो! कुणाचे आदर्श ठेवतील ते? तुमच्यासारख्यांचे? अहो, तुमची मूल्ये आणि नीतिमत्ता जरा स्वतःसंदर्भात लागू करून पहा! तुम्ही आदर्शांची उंची खुजी केलीय आमच्यासाठी. हो तुम्हीच. 'ऑल इज रेडिमेड हिअर'चा जमाना. आमच्या डोळ्यांपुढे तुमच्याच स्वतःच्या स्वप्नांची आभासी प्रतिमा नाचवता आणि ती साकार करण्यासाठीची अतिरेकी धडपड करता. आमचं जीवन आम्हालाच घडा-बिघडवायचं असा आततायी हट्ट नाहीये, पण पदव्यांच्या भेंडोळ्या स्वप्नधांडोळ्यात खऱ्या ठरत नसताना जगण्याचं शिक्षण अगदी खरंखुरं पाहिजे हो आम्हाला हे कोण अन कधी समजून घेणार? एम.बी.ए. होऊन चहाची टपरी टाकायची, पोटासाठी धडपडताना 'ऍडमिनस्ट्रेशन ऑफ स्टमक' एवढेच खरं उरतं. 

कण्हत कण्हत जगताना तुम्ही काय जगण्याचं गाणं शिकवणार? म्हणून पेटून उठतो आम्ही. स्वतःचा संघर्ष स्वतःशीच. यातून उसळतो क्रोध अनिवार. क्रोध स्वतःवरचा, समाजवरचा आणि व्यवस्थेवरचा! आणि सामाजिक स्वास्थ्य शिकवणारे राजकारणी 'वापरा आणि फेकून द्या' एवढंच आमच्यासाठी गृहीत धरणारे. 'मतांचे शिक्के'एवढीच आमची किंमत. त्या किंमतीला रंग-झेंड्यांच्या दोरांनी आणि दंभद्वेषाच्या रेषांनी बांधून राजकिय स्वार्थासाठी बळी द्यायचं... 

पुस्तकं, संकटं आणि परिस्थिती हेच खरे गुरू असं म्हणतात. त्यातला पुस्तकांचा कोपरा आमच्यासाठी आमच्यादृष्टीनं कधीच बंद झालाय. कधी आठवण झालीच तर रोमँटीझम उगळायला कॉलेजची लायब्ररी बरी वाटते. वैचारिक खुराक, बौद्धिक विकास हे सगळं भंकस ठरतं आणि पॉकेटबुक्स, व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, मोबाईलवर स्वतःला रिझवत बसतो, नाटक सिनेमातून कुणी विकाऊ लेखक स्वप्नभास दाखवत, खिजवत असतो पानापानांतून अगर पडद्यावर फिल्ममधून. आम्ही ओढतो ते स्वप्नभासांचे जाळे डोळ्यांवर मनावर आणि बनतो वेडे प्रेमवीर! ओल्या उशासांची साथसंगत! सगळं वास्तवाच्या विस्तवात वितळून हाती कोळसा देणारं! 

परिस्थितीचे वेदनासर्प आणि संकटांचे घनघाव यांचे मेतकूट सदोदितच. जीवनाची चाहूल घेत पडणारे प्रत्येक पाऊल शोधकतेने पुढे पडणारे, पण पुढे खड्डा की उत्कर्षवाट याची सततची धाकधूक, साशंकता. पिच्छा पुरवणारी लढाई न चुकणारी! म्हणूनच अंगार हा शृंगार झालेला आमचा! उद्वेगी, अतिरेकी आणि आततायी....! 
   

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News