पोलीस विभागाअंर्गत परीक्षांना पुस्तक वापरता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 July 2020
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती   

मुंबई : परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस उपायुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून, त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कोरोनामुळे राज्यातील पोलिस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधितांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आली होती. त्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. 

या वर्षासाठीच्या दोन परीक्षांकरिता पुस्तकांसहित परीक्षेची परवानगी दिली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त (नि:शस्त्र) या पदावर सरळसेवेने नियुक्त झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी, त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते.

ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मात्र जुलै 2013 नंतर आयोगामार्फत अशी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील 182 अधिकारी ही परीक्षा देणे बाकी आहेत. 22 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये पोलिस अधिकारी (निवडश्रेणी व उच्च श्रेणी) यांच्या विभागीय परीक्षांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला. ही परीक्षा आता अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) आणि महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News