"बुसान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार बॉलीवूडचा 'हा' चित्रपट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते.

मुंबई: अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला "गली बॉय' हा चित्रपट मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या "बुसान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे. या निमित्ताने या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते.

"गली बॉय' या चित्रपटाची कथा एका रॅपरभोवती फिरणारी आहे. झोपडपट्टीत राहणारा एक तरुण रॅपर होण्याची इच्छा बाळगतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव मिळवावे, अशी त्याची इच्छा असते. ही रॅपरची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण धारावीत झाले आहे. झोया अख्तरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाची भारतातर्फे निवड करण्यात आली होती. ऑस्करच्या स्पर्धेतून हा चित्रपट बाहेर पडला असला तरी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाने मिळविले आहेत.

मागील वर्षी दक्षिण कोरियामधील बुकियॉन इंटरनॅशनल फॅंटास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये (बीआईएफएएन) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट म्हणून "एनईटीपीएसी ऍवॉर्ड' मिळाला होता. आता या चित्रपटाला लोकप्रिय सिनेमा म्हणून लोकाग्रहास्तव "रिक्वेस्ट सिनेमा स्क्रीनिंग श्रेणी'मध्ये प्रतिष्ठित अशा "बुसान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट महोत्सव 7 ते 16 ऑक्‍टोबर असा दाखवण्यात येणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News