बाॅलीवूड आणि ड्रग्स असं नातं जुळण्यापूर्वीपासून या फिल्म इंडस्ट्रीचं एक जुनं नातं आपल्याला माहिती आहे का? ते म्हणजे बाॅलीवूड आणि कपूर घराणं... करीना कपूरच्या आजोबा, पणजोबांपासूनचं हे नातं आहे. या कपूर घराण्यातला असाच एक गोंडस चेहरा म्हणजे शम्मी कपूर.
एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीसला रात्री साडेनऊ वाजता पृथ्वीराज आणि रामशरणी कपूर यांचं चौथं अपत्य मुंबईत जन्मल - ज्याचं नाव त्यांनी शमसेर राज उर्फ शम्मी कपूर ठेवलं.त्याचा जन्म आणि बारसं यांचा त्यांनी फारसा गाजावाजा केला नाही कारण त्यांची त्या आधीची दोन अपत्ये अचानक दुर्दैवीरीत्या देवाघरी गेली होती.
त्याला लहानपणा पासूनच संगीताचं वेड लावण्याचं श्रेय दोन व्यक्तींना जातं - एक त्याची आई रामशरणी देवी जी स्वतः एक शास्त्रोक्त संगीताची विद्यार्थिनी होती आणि नर्गिस जिनं त्याला आवारा चित्रपट तिला राज कपूर बरोबर करायला मिळेल असं भाकीत त्यानं वर्तवलं म्हणून एक लाल रंगाचा सुबक ग्रामोफोन आणि वीस एलपी (तबकड्या ज्याच्यावर संगीत अथवा गाणी रेकॉर्ड केली जायची) भेट दिल्या होत्या.त्याचा संगीत आणि गाण्याबाबतचा सेन्स जबरदस्त होता. सॉंग प्रेझेंट कसं करायचं याचा तो आदर्श होता. त्या प्रक्रियेत तो पूर्णपणे ईनव्हॉल्व्ह व्हायचा, स्वतःला झोकून द्यायचा.
त्याला ऍक्टर बनण्यात खरंतर फारसं स्वारस्य नव्हतं.त्याचे वडिल त्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल साशंक असल्यामुळे त्यांनी त्याला आज ना उद्या थिएटर जॉईन करायला लागेलच असे सांगून पृथ्वी थिएटरच्या नाटकामध्ये दहावीचा रिझल्ट लागायच्या आधीच इंदोरच्या दौऱ्यावर यायला सांगितले.
पण अनपेक्षितपणे तो मॅट्रिकची परीक्षा पास झाला आणि त्याने रुईया कॉलेजला विज्ञान शाखेला प्रवेश घेतला-थिअरी चे बोरिंग क्लास त्याला आवडत नसत पण प्रयोग मात्र तो आवडीनं करीत असे.
बावीसाव्या वर्षी १९५३ साली ए आर कारदार निर्मित आणि महेश कौल दिग्दर्शित जीवनज्योती चित्रपटात त्याला ११,१११ रुपये मानधनावर नायक म्हणून पहिला ब्रेक मिळाला.त्या पैशातून त्यानं चोवीस महिन्यांच्या हप्त्यांवर निगार सुलताना या नटीची सेकंड हॅन्ड आकाशी रंगाची ब्युईक सुपर कनव्हरटिबल (बी एम वाय 3009 )घेतली -जी शेवटपर्यंत त्याच्या ताफ्यात राहिली.
श्यामा, सुरैया, मधुबाला, नूतन अशा वेगवेगळ्या वयाच्या नायिकांबरोबर तब्बल एकोणीस चित्रपटात त्यानं काम करूनही त्यातला एकही हिट झाला नाही. त्याच्यावर राज कपूरचा क्लोन म्हणून सर्व माध्यमांनी शिक्का मारून टाकला.
फक्त सहावी पास असलेल्या हरकीर्तन कौर उर्फ गीता बाली हिला सुप्रसिद्ध दिग्दर्शक किदार शर्मा यांनी पहिला ब्रेक दिला होता.एका शिक्षकाची मुलगी असलेल्या गीताचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होतं-तिच्या बहीण आणि भावाला कमी ऐकू येई व वडिलांना देवीच्या लसीमुळे अंधत्व आले होते.
अल्डा उर्फ माला सिन्हा या नेपाळी ख्रिश्चन नटीला ब्रेक देण्याची शिफारस तिने तिचे गुरू किदार शर्मा यांना केली होती."रंगीन रातें"या चित्रपटात त्यांनी मालाला घेतले पण गीताला जेव्हा हे कळले तेव्हा तिला थोडा हेवा वाटला की आपणच या चित्रपटात नाही. मग तिने त्यांना गळ घालून तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी छोटीशी टॉमबॉईश भूमिका मिळवलीच.
शूटिंग दरम्यान शम्मी आणि गीता यांचे सूत चांगलेच जुळलं.२ एप्रिल १९५५-रात्रीचं जेवण उरकून शम्मी आणि गीता परत येत होते. रस्त्यात एका पुलावर जीपच्या बॉनेटवर नाचत गीता त्याला ओरडून सांगत होती-तुझी शिकार (वाघ) याच दिशेला गेली आहे, लवकर तुझी बंदूक आण.
शम्मीला तिच्या निडरपणाचं आणि उत्स्फूर्ततेचं कौतुक वाटलं आणि तो तिच्या प्रेमात पडला-खरं तर तिलापण तो खूप आवडू लागला होता आणि त्याच्यावरील प्रेमाखातर आणि त्यापोटी माला सिन्हाबद्दल वाटणाऱ्या मत्सरापोटीच तिनं किदार शर्माना या चित्रपटात एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही स्वतःहून भूमिका मागितली होती.त्यावेळी ती चोवीस वर्षांची होती आणि शम्मी तेवीसचा.२४ ऑगस्ट १९५५ च्या भल्या पहाटे हरी वालिया या एकमेव साक्षीदारासमवेत त्यांचा विवाह बाणगंगा मंदिरात संपन्न झाला.
कपूर खानदानाच्या परंपरेनुसार शम्मीला त्याचं बिऱ्हाड त्यांचं पहिलं अपत्य आदित्य राज याच्या जन्मानंतर चेंबूरला वेगळं थाटावं लागलं. गीताची कामं कमी झाल्यामुळे आणि तिला तिची प्रॉपर्टी लग्नानंतर थोडं असुरक्षित समजायला लागणाऱ्या माहेरच्या माणसांच्या नावावर करायला लागल्यामुळे, तसंच शम्मीचे एकोणीस चित्रपट प्रदर्शित होऊनही त्यातला एकही हिट न झाल्यामुळे ते दोघेही चिंतित झाले,त्यातच बाळाची जबाबदारी येऊन पडली होती. त्यावेळी शम्मी करियरचे इतर पर्याय शोधू लागला होता. आसामच्या चहाच्या मळ्यावर इंग्लिश साहेबाच्या स्टाईल मध्ये इस्टेट मॅनेजर म्हणून काम करावंसं त्याला वाटू लागलं होतं. गीताशी त्यानं तसं बोलूनही दाखवलं.
पण दैवानं काही वेगळंच लिहून ठेवले होते.
गीताने त्याला तो जसा आहे -उत्साही,धसमुसळा, उस्फुर्त-तसाच कॅमेऱ्यासमोर पेश व्हायला सांगितलं. त्याचं राज कपूरला कॉपी करणं तिलाही बिलकुल आवडत नव्हत.त्याच्याशी चेहऱ्यात असणारं साम्य घालवण्यासाठी तिनं त्याला मिशी काढून टाकण्याचा सल्ला दिला. तिच्यातल्या कलाकाराने त्याच्यातल्या कलाकारातला स्पार्क बरोबर ओळखला होता.लोकांना काहीतरी वेगळं हवंय आणि ते तुझ्यात ठासून भरलेलं आहे हा विश्वास तिनं त्याला दिला.
जयजयवंती उर्फ अमिता या नवोदित नटीबरोबर काम करणं पसंत नसल्याने देव आनंदने त्याच्या आवडत्या पटकथा लेखक असणाऱ्या नासिर हुसेनने लिहिलेली "तुमसा नहीं देखा" ची ऑफर नाकारली. ती एक रोमँटिक म्युझिकल कथा होती जी त्यानं देव आनंदला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली होती.
"हम सब चोर है" या फिल्मीस्तानच्या फ्लॉप चित्रपटानंतर त्यांना कमी बजेट मध्ये हिट चित्रपट बनवणं आवश्यक झालं होतं.अमिता आणि शम्मी ही कमी मानधन असणारी जोडी त्यांना परवडणारी होती.
शम्मीनं या चित्रपटात स्वतःचा कायापालट केला-परदेश प्रवासात जमवलेली जॅकेट्स, स्वेटर्स, मफलर्स त्यानं या चित्रपटात वापरले. जेम्स डीन या हॉलीवूड ऍक्टरला त्याने फॉलो केलं-जो रिबेल स्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्याची उत्स्फूर्त आणि बिनधास्त अदाकारी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.त्याचं सॉंग प्रेसेंटेशन-जी पुढे त्याच्या सगळ्या चित्रपटात त्याची खासियत ठरली-तेव्हाच्या देव राज दिलीप यांच्यापेक्षा वेगळं आणि उजवं ठरलं.
जवानियां ये मस्त मस्त बिन पिये, युं तो हमने लाख हसीन देखे है,देखो कसम से,आये है दूर से ही गाणी आणि शम्मी कपूर रातोरात सुपरहिट झाले.
- नितीन श्रोत्री
सीईओ, क्वाँटम लीप कन्सल्टंट्स, पुणे