अवघ्या ३० सेकंदांत रक्तगट कळणार

संतोष शाळिग्राम
Friday, 18 October 2019
  • अनुराग कणसे यांनी संशोधन करून दोन- तीन रुपये एवढ्या अत्यल्प दरात उपलब्ध होईल असे रक्तगट सांगणारे उपकरण तयार केले आहे.

पुणे: अवघ्या तीस सेकंदांमध्ये आणि तीन रुपयांत रक्तगट सांगणारे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले आहे. त्याचे प्राथमिक उपकरणही तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भाग आणि संकटकाळात जखमींना तातडीने रक्ताचा पुरवठा होण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. सद्यःस्थितीत रक्तगट शोधायचा असेल, तर पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त पाठवावे लागते. त्यानंतर तासाभराने रक्तगट समजतो. परंतु, विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अरुण बनपूरकर, पीएचडीचे विद्यार्थी संदीप वाढाई आणि अनुराग कणसे यांनी संशोधन करून दोन- तीन रुपये एवढ्या अत्यल्प दरात उपलब्ध होईल असे रक्तगट सांगणारे उपकरण तयार केले आहे. यामुळे रक्ताच्या एका थेंबात अवघ्या तीस सेकंदात रक्तगट समजू शकणार आहे.

संशोधनाबाबत ‘सकाळ’शी बोलताना वाढाई म्हणाले, ‘‘आपत्कालीन स्थितीत बऱ्याचदा रुग्णाला तातडीने रक्ताची गरज लागते. अशावेळी त्याचा रक्तगट माहिती असतोच असे नाही. त्याचा रक्तगट क्षणार्धात समजला, तर तातडीने रक्त देऊन त्याचे प्राणही वाचविता येतील. या विचाराने आम्ही केलेल्या संशोधनाला यश मिळाले आहे.’’ सध्या उत्पादनपूर्व चाचण्या सुरू आहेत.

असे आहे संशोधन
माणसाचा रक्तगट काही सेकंदांत सांगणारे उपकरण हे विशिष्ट कागदापासून बनविण्यात आले आहे. त्याचे स्तर तयार करून रंगसंगतीच्या माध्यमातून रक्तगट सांगणारी रचना केली आहे. या कागदाच्या एका बाजूला रक्ताचा एक थेंब टाकल्यानंतर तो स्तरित रचनेतून फिरेल आणि तीस सेकंदांत दुसऱ्या बाजूला असणाऱ्या बिंदूंची रंगसंगीत बदलून रक्तगट समजेल. साधारणपणे एक चौरस इंच आकाराचेच हे उपकरण आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News