भाजप या ठिकाणी करणार राष्ट्रवादीचे घड्याळ बंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • उल्‍हासनगरला कलानी-आयलानींमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच!

  • ओमी कलानी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून  घड्याळाची टिकटिक कायम थांबवण्यासाठी प्रयत्नशील 

कल्याण - लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षात उल्हासनगर शहरातील राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला असून, आगामी विधानसभेत या ठिकाणी कमळ फुलविण्याचे मनसुबे भाजपचे आहेत.

मात्र, वादग्रस्त पार्श्‍वभूमी असलेल्या पप्पू कलानी यांचे पूत्र ओमी कलानी हे भाजपमध्ये प्रवेश करून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची दाट शक्‍यता आहे. या वृत्ताला ओमी यांनीही दुजोरा दिल्याने आगामी काळात येथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. 

उल्हासनगर विधानसभा ही राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी या येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारामध्ये त्यांचा फारसा सक्रिय सहभाग दिसला नाही. 

पुत्राच्या राजकीय भवितव्यासाठी राजकारणातून त्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत. ओमी कलानी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून कमळ फुलवत या ठिकाणी घड्याळाची टिकटिक कायम थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी हे सुद्धा येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. लोकसभेच्या वेळी युतीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. त्यामुळे उमेदवारीवरून दोघांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्‍यता नाकारता 
येत नाही.

आमदार ज्योती कलानींच्या भूमिकेकडे लक्ष
विधानसभेच्या निवडणुकीसाठी आवश्‍यक ते संघटन माझ्याकडे असून मतदारयादी व इतर कामांना सुरुवात केली आहे. कमळ चिन्हावर मी निवडणूक लढू शकतो, असे ओमी कलानी यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

मात्र, ज्योती कलानी या नेमकी कोणती भूमिका घेणार? याबाबत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात आगामी काळात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून भाजप पुन्हा राष्ट्रवादीला राजकीय धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News