भाजपचा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • ममता बॅनर्जी यांचे केंद्रावर टीकास्त्र; राज्यात स्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा

कोलकता - ‘बंगाल म्हणजे गुजरात नव्हे,’ असा हल्ला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला असून, भाजप राज्यात अशांतता माजवीत असल्याचा आरोप केला आहे. भाजपविरुद्ध आवाज उठविणारी मी एकमेव असल्यामुळे माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपने मारलेल्या मुसंडीनंतर ममता बॅनर्जी आणि केंद्रातील भाजप आघाडीचे सरकार यांच्यातील संघर्ष थांबण्यास तयार नाही. त्यातच ममता बॅनर्जी यांनी पुन्हा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘बंगाल म्हणजे गुजरात नव्हे. उत्तर प्रदेशात मुलांचे खून होत आहेत. आम्ही हे चालू देणार नाही. विजयानंतर भाजप राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे षड्‌यंत्र आहे. पण, आम्ही बळापुढे झुकणार नाही.’’

राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावरून भाजपच्या अनेक मंत्र्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानेही चिंता व्यक्त केली असली, तरी स्थिती पूर्ण नियंत्रणाखाली असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

जबाबदारीने वार्तांकन करावे, असा सल्ला ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. भाजप तुम्हाला जाहिराती देत असल्यामुळे तुम्ही त्यांना अनुकूल बातम्या देत आहात, असा आरोप त्यांनी केला. खोट्या बातम्या देऊन आमचे सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे.

तसेच, सोशल मीडियाच्या विविध संकेतस्थळांवरून अशा बातम्या दिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ भाजपच्या पश्‍चिम बंगाल शाखेने आज बारा तासांचा ‘काळा दिवस’ पाळला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बशीरहाट उपविभागात हा दिवस पाळला गेला. राज्याच्या विविध भागांत भाजपने मोर्चेही काढले होते. 

दरम्यान, बशीरहाटजवळील संदेशखाली येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्यामुळे वातावर तणावाचे होते. अनुचित घटना टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्थितीची कल्पना दिली ; त्रिपाठी
पश्‍चिम बंगालमधील स्थितीची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याची माहिती राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी दिली. मात्र, काय चर्चा झाली, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत चर्चा झाली का, या प्रश्‍नावर, ‘तसे काही बोलणे झाले नाही,’ असे त्रिपाठी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यपालांनी प्रथमच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबरोबर चर्चा केली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News