भाजपने देशात धार्मिक वातावरण बिघडवले ; ईव्हीएममध्येही केली गडबड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • देशात धार्मिक ध्रुवीकरण केले

 

मुंबई : ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट या दोन्ही यंत्रांमध्ये काहीच गडबड झाली नाही. मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशीनमध्ये गडबड झाली,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला. याबाबत मला या क्षेत्रातील अनेक जाणकारांनी याविषयी माहिती दिली असून, त्यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी देशभरातील मित्रपक्ष आणि इतर तज्ज्ञांशी बोलून याविषयी निर्णय घेणार असल्याचेही पवार या वेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त आज पक्षाकडून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयापासून जलदिंडी काढण्यात आली होती, तिचा समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. पवार म्हणाले की, मतदान करताना ज्यावर बटन दाबले त्याची चिठ्ठी दिसते. त्यावर तुमचे समाधान झाले हे इथपर्यंत बरोबर होते. या दोन्हीमध्ये काही गडबड नव्हती. मला काही तज्ज्ञांनी याविषयी माहिती दिली; पण ज्या ठिकाणी मतमोजणीच्या ज्या मशीनमध्ये मतमोजणी झाली त्यात खरी गडबड  झाली आहे.

मतमोजणी करताना एक अधिकारी मोजणी केंद्रात बसतो. त्या अधिकाऱ्याच्या समोर एक यंत्र असते. तिथे मशिनची मतमोजणी होते. या मशीन देशात दोनच कंपन्या बनवतात. याच कंपन्या यात सेटिंग करतात. हे सेटिंग्ज करायला आठ ते दहा लोक लागतात, त्यापेक्षा अधिक लागत नाहीत. हे लोक संबंध देशाचे काम काही तासांत करू शकतात, हे इतके सोपे आहे.

यात आम्ही वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप असून, याबाबत देशभरात राजकीय पक्षांकडून आवाज उठवला जात आहे. अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतपत्रिकेवर मतदान घ्या; अन्यथा मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

देशात धार्मिक ध्रुवीकरण
शरद पवार यांनी आज सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. ‘देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या संकल्पनेला तिलांजली द्यायची आहे. म्हणूनच बाँबस्फोट प्रकरणात आरोप असलेले लोक संसदेत आणले आहेत. जगात आधुनिकतेला स्थान दिले जात असताना पंतप्रधान भगवे वस्त्र घालून गुहेत बसतात.

लोकांच्या मनात जाणीवपूर्वक राष्ट्रवादाचा मुद्दा आणून देशात धार्मिक ध्रुवीकरण केले, त्यांना त्याचा राजकीय फायदा मिळाला. त्यांनी लोकांच्या मनावर खोटे चित्र रंगवले. पाकिस्तानला घरात घुसून मारू, असे म्हणणारे निवडणुकीनंतर कसे शांत झाले, असा सवाल पवार यांनी केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News