सुशांतच्या प्रकरणावर गल्लीच्छ राजकारण करून बिहार निवडणुकीचे केले जातेय भांडवल ; रोहित पवारांनी दिला पुरावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 September 2020
  • अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून अनेक राजकीय वाद देखील झाले आहेत.
  • या आत्महत्या प्रकरणाचा बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचे दिसून येत आहे.

मुंबई :- अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून अनेक राजकीय वाद देखील झाले आहेत. या आत्महत्या प्रकरणाचा बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर आणि मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून भाजपावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुशांतच्या प्रकरणाचे वाईट राजकारण केले जात असल्याचे म्हटले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीच एक ट्विट केले आहे. यामध्ये वृत्तपत्रांमध्ये आलेल्या काही बातम्या आणि भाजपाच्या निवडणूक प्रचाराचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी या राजकारणाचा पुरावाच दिला आहे. तसेच बिहार निवडणुकीसाठी भांडवल केले जात असल्याचे देखील म्हटले आहे. "सुशांतसिंह राजपूत यांच्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचे वाईट राजकारण केले जात असल्याचे आणि आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केले जात असल्याचे दिसत. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा अजेंडा आहे. पण या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत" असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

 

भाजपाच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले ३० हजार स्टीकर आणि मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे आणि राजकारणाचा विषय झाला आहे. या तपासाच्या मुद्यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्रातील सरकार असाही संघर्ष झाला होता.

भाजपतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा वापर, नवी प्रचारखेळी

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा भाजपा ज्या पद्धतीने वापर करू पाहत आहे, त्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली आहे, तर अनेकांनी भाजपला समर्थनही दिले आहे. एका नेटकऱ्याने ट्विटरवर लिहिले आहे की, सुशांतसिंहला न्याय मिळवून द्यायचा असेल तर भाजपालाच मतदान करा. आणखी एका नेटकऱ्याने टीका करताना म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अनेक जण तारस्वरात बोलत आहेत. त्यामुळे भाजपाला त्यातून राजकीय लाभ नक्कीच उठविता येईल. कदाचित कंगना राणावतला भाजपकडून निवडणुकीत उमेदवारीही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News